मुंबई / प्रतिनिधी 26 May 2016
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील छोट्या व मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे सुरु असून नाल्यातून काढलेला गाळ केवळ दोन पाळ्यांमध्ये व त्याच दिवशी वाहून नेण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नाल्यातून काढण्यात आलेला गाळ काही ठिकाणी शिल्लक राहून नाल्यांच्या शेजारी गाळ जमा करुन ठेवलेला दिसत आहे. ही बाब लक्षात घेता आजपासून नाल्यातून काढण्यात येणारा गाळ वाहून नेण्याची कार्यवाही रात्री देखील करावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यास दिले आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून पुढील चार रात्रींपर्यंत ही कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे काढलेला गाळ तीनही पाळ्यांमध्ये व वेळच्या वेळी वाहून नेणे महापालिकेला शक्य होणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणारे मोठे व छोटे नाले इत्यादींमध्ये साचलेला गाळ काढून नालेसफाई करण्याची कार्यवाही सध्या वेगात सुरु आहे. या कार्यवाही दरम्यान काढण्यात आलेला गाळ नाल्यांच्या बाजूला एका कोप-यात ठेवून नतर तो वाहून नेला जातो. आजपर्यंत हा गाळ दोन पाळ्यांमध्ये वाहून नेण्याची व्यवस्था होती. यापैकी प्रत्येक पाळीमध्ये छोट्या नाल्यांमधील गाळ ४० डम्पर्स द्वारे तर मोठ्या नाल्यांमधील गाळ ६० मोठ्या ट्रक द्वारे वाहून नेला जात होता. मात्र नाल्यातून काढण्यात येणा-या गाळाचे प्रमाण अधिक असल्याने काही ठिकाणी नाल्यांच्या बाजूला शिल्लक राहिलेला गाळ दिसत होता. यातून मार्ग काढण्यासाठी आज रात्रीपासून ६० मोठे ट्रक व ४० डम्पर या द्वारे हा गाळ वाहून नेला जाणार आहे. यातील मोठ्या ट्रकची गाळ वाहून नेण्याची क्षमता ही प्रत्येक फेरीला १५ टन इतकी आहे. तर डम्पर ची क्षमता प्रत्येक फेरीला १० टन इतकी आहे.
No comments:
Post a Comment