कोट्यवधींच्या घरांत आठ ट्रक कचरा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2016

कोट्यवधींच्या घरांत आठ ट्रक कचरा!

मुंबई - मुलुंडमधील एका इमारतीतील घरातून आठ ट्रक भरून कचरा महापालिकेने बाहेर काढला आहे. मुलुंड पश्‍चिम येथील अशा जव्हेर रोडवरील गाईड को-ऑप. सोसायटीतील तीन खोल्यांच्या घरात एका विक्षिप्त कुटुंबाने घरातच कचरा साठवून ठेवला होता. घरातला कचरा त्यांनी कधीही घराबाहेर टाकला नाही. उलट, घराबाहेर मिळेल तितका कचरा जमा करून त्यांनी घरात आणला होता. घरातील या डम्पिंग ग्राऊंडमध्येच हे कुटुंब राहत होते. कहर म्हणजे, त्यांनी 90 वर्षांची दृष्टिहीन आई मणीबेन सावला हिला कोंडून ठेवले होते. 

या घरातून असह्य दुर्गंधी येत होती. अनेक दिवस इमारतीतील रहिवासी महापालिकेकडे याविषयी तक्रार करत होते. इमारतीतील रहिवाशांना आपल्या घरात झोपणेही मुश्‍कील झाले होते; परंतु पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. अर्थात, या अतर्क्‍य घटनेविषयी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कल्पना येणे अशक्‍य होते. अखेर काही रहिवाशांनी मंगळवारी (ता. 17) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याविषयी कळवले. पोलिसांनी घराची पाहणी केली. आत एखादा मृतदेह असावा. त्याची दुर्गंधी येत असावी, असे पोलिसांना वाटले. घराचे दार बंद होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पोलिस खिडकीचे गज तोडून आत घुसले. असह्य दुर्गंधीमुळे त्यांनाही नाक दाबून धरावे लागले. समोरचे दृश्‍य पाहून त्यांना धक्काच बसला. सगळीकडे कचरा पसरला होता. तीन खोल्या कचऱ्याने भरलेल्या होत्या. पहिल्या मोठ्या खोलीतील कचऱ्याचा ढीग पंख्यापर्यंत पोचला होता. कोट्यवधींची किंमत असलेल्या या फ्लॅटमध्ये सगळीकडे कचराच पसरलेला होता. हे पाहून शेजाऱ्यांनाही धक्का बसला. आत एक 90 वर्षांची वृद्धा निपचित पडलेली दिसली. तिला शरीराची हालचालही करता येत नव्हती. पोलिसांनी लगेच तिला बाहेर नेले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. खूपच कचरा असल्याचे कळल्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक ट्रकच घेऊन आले. हळूहळू कचरा बाहेर काढण्यास सुरवात झाली. इतक्‍यात त्या घरात राहणारे चार जण धावत आले. आमच्या घरात परवानगी न घेता शिरताच कसे, असे म्हणत त्यांनी पोलिसांना आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना दूर केले. पाहता पाहता आठ ट्रक कचरा सायंकाळपर्यंत बाहेर काढण्यात आला. तोपर्यंत सोसायटीतील रहिवासी दारे-खिडक्‍या बंद करून बसले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad