मुंबई - भांडुपच्या शिवाजी तलावात मृत मासे, त्याची असह्य दुर्गंधी आणि दूषित पाणी असे दृश्य पाहायला मिळत आहे. रविवारी तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आणि तलावातील हजारो मासे तडफडून मेले. सध्या तलावात मृत माशांचा खच झाला असून परिसरात माशांची दुर्गंधी पसरली आहे.
भांडुप पश्चिम येथील शिवाजी तलावामध्ये गेले कित्येक वर्षे कचरा, निर्माल्य आणि गाळाचे साम्राज्य होते. परिणामी, या तलावाचे पाणी दूषित झाले होते. भांडुपमधील या जुन्या व मोठ्या तलावाची ही अवस्था पाहून स्थानिकांनी हा तलाव स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडे तगादा लावला. स्थानिकांच्या मागणीचा जोर वाढल्याने अखेर महापालिकेने रविवारी हा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली.
रविवारी रात्री यंत्राच्या साहाय्याने तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले. परंतु, या यंत्रामुळे तलावात असलेले हजारो मासे घुसळून निघाले आणि तडफडून अखेरचा श्वास घेऊ लागले. त्याचबरोबर या तलावात असलेले कासव, पाणबदक व अन्य जलचरांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.च्अनेक मासे रात्रीच मेले. सकाळी मृत मासे पाण्यावर तरंगू लागेल आणि परिसरात दुर्गंधी पसरली. या दुर्गंधीमुळे भोवतालच्या परिसरातील स्थानिकांना राहणेही असह्य झाले आहे.
तलाव खोल असून, गाळ पूर्ण निघेपर्यंत हे काम सुरूच राहणार आहे. तलाव स्वच्छ करण्याचे काम आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे तलाव स्वच्छ करणाऱ्या एका मजुराने सांगितले. पर्यायाने स्थानिकांना आणखी काही दिवस ही दुर्गंधी सहन करावी लागणार आहे. मात्र, काही लोकांच्या हे चांगलेच पथ्यावर पडले. दूषित पाण्यातील मृत मासे ‘ताजे मासे’ आहेत असे भासवत काही संधीसाधूंनी हे मासे बाजारात विकले.
तलाव परिसरात निर्माल्य कलश बसवण्यात आला आहे. पण अनेक रहिवासी अनेकदा सांगूनही निर्माल्य तलावात भिरकवतात. एक-एक निर्माल्य टाकता आता एवढा गाळ तयार झाला आहे. स्वच्छता अभियानाचे निर्माल्य फेकणाऱ्यांनी तीनतेरा वाजवले आहेत. याचा नाहक त्रास माशांना झाला आहे. काल गाळ उपसायला गेल्यानंतर मासे तडफडून मरत होते असे तलावाच्या सुरक्षारक्षकाने सांगितले.
No comments:
Post a Comment