मुंबई, दि. 18 - महाराष्ट्रात उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा देण्यात येत आहेत. तसेच उद्योगवाढीसाठी मेट्रो, सी लिंक, टेक्स्टाईल पार्क, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगांसाठी पसंतीचे आवडते ठिकाण झाले आहे. कोरियातील उद्योगांनीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
दक्षिण कोरियातील गायोनगी प्रांतातर्फे सहारा स्टार हॉटेल येथे ‘जी-फेअर, कोरिया सोर्सिंग फेअर 2016’ चे या दोन दिवसीय उद्योग मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी गायनोगी प्रांताचे उप राज्यपाल यांग बोक वान, कोरियाचे मुंबईतील महावाणिज्यदूत साऊंग किम, गायनोगी लघु व मध्यम व्यापार केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो गिल यून, गिम्पो शहराचे महापौर युंगगोर्क यो, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री, भारतीय लघु व मध्य उद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, वर्ड ट्रेड सेंटरचे कार्यकारी संचालक व्ही. रंगराज आदी यावेळी उपस्थित होते.
देसाई म्हणाले की, भारत आणि कोरिया या देशांमध्ये 1962 पासून व्यापारी संबंध आहेत. हे संबंध आणखी वाढावेत,यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल. तसेच महाराष्ट्र व गायोनगी प्रांतामध्येही आर्थिक, उद्योग,पर्यटन, सांस्कृतिक व व्यापारी संबंध प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. उत्पादनांचा दर्जा व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोरियामधील अनेक कंपन्यांच्या उत्पादनांना पसंती दिली जाते.
महाराष्ट्र शासनाने गुंतवणूक वाढावी, यासाठी उद्योगस्नेही धोरण अवलंबविले आहे. इज ऑफ ड्युइंग बिझनेसद्वारे अनेक सुधारणा केल्या आहेत. किरकोळ व्यापारी धोरण, माहिती तंत्रज्ञान धोरण, परवान्याच्या सुलभीकरणासाठी ‘मैत्री’ योजना, सिंगल विंडो सिस्टीम आदी उपाययोजना केल्या आहेत. उद्योग उभारणीसाठी संपूर्ण सहकार्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. याशिवाय पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक, ट्रान्सपोर्ट हब आदी प्रकल्पही सुरू केले असून त्यांची कामे मोठ्या गतीने सुरू आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.
देसाई म्हणाले की, मेक इन इंडिया सप्ताहामध्ये महाराष्ट्र शासनाने साडेआठ लाख कोटी गुंतवणुकीचे करार केले आहेत. देशातील तसेच जागतिक स्तरावरील कंपन्यांबरोबर हे सामंजस्य करार केले आहेत. कोरियामधील उद्योगांनाही येथे गुंतवणुकीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल. याद्वारे कोरिया व भारत आणि महाराष्ट्र व गायोनगी प्रांत यांच्यातील व्यापारी संबंधाचा नवे मैत्री पर्व सुरू होईल. हे संबंध आणखी वाढविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
वान म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. मुंबई हे भारतातील महत्त्वाचे शहर असून आधुनिक संपर्काच्या साधनांमुळे येथे हा उद्योग मेळा भरविण्यात आला आहे. या उद्योग मेळ्यामधून कोरिया तसेच महाराष्ट्र मधील व्यापर वाढण्यास मदत होईल,त्यामुळे दोन्ही देशातील उद्योजकांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. या उद्योगमेळ्याचे हे आठवे वर्ष असून यावर्षी कोरियामधील सुमारे शंभर कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment