मुंबई, दि. 17 : राज्यातील पेट्रोल व डिझेलवर असलेला अतिरिक्त राज्य विशेष अधिभार (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) केंद्र शासनाने काल मध्यरात्रीपासून रद्द केला आहे. पेट्रोलवरील 1.12 पैसे तर डिझेलवरील 91 पैसे अधिभार रद्द केल्यामुळे इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील इंधन स्वस्त झाले असून यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पाठपुरावा केला होता.
राज्यातील इंधनावरील अतिरिक्त राज्य विशेष अधिभार रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांनी केंद्र शासनाकडे मागणी केली होती. तसेच आमदार शोभाताई फडणवीस याही अनेक दिवसांपासून या विषयावर पाठपुरावा करत होता.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अतिरिक्त राज्य विशेष अधिभार काल दिनांक 16 मे च्या मध्यरात्रीपासून रद्द केला. यामुळे संपूर्ण देशात काल झालेल्या पेट्रोलवरील दरवाढ ८३ पैसे प्रती लिटर ऐवजी महाराष्ट्रात ६० पैशाने पेट्रोल स्वस्त झाले असून डिझेलही देशात १ रुपया २६ पैशाने वाढले असता अधिभार रद्द झाल्यामुळे डिझेलवरील दरवाढ फक्त २१ पैशाने झाली आहे. मागील तीन महिन्यात राज्य शासन आणि बापट यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाने राज्य विशेष अधिभारात केलेल्या कपातीमुळे महाराष्ट्रात डिझेल प्रती २ रुपये २० पैसे व पेट्रोल २ रुपये ५० पैसे स्वस्त झाले आहे.
पेट्रोल डिझेल असोसिएशनने ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांच्याकडे अतिरिक्त अधिभारासंदर्भात तक्रार केली होती. या अधिभारामुळे देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या किमती जास्त होत्या. यामुळे राज्यातील डिझेलची विक्री इतर राज्यात स्थलांतरित होऊन राज्याचे मागील तीन वर्षात ९५०० कोटी रुपयांचे मूल्यवर्धित करातून मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान झाल्याची तक्रार असोसिएशनने केली होती. या बाबीची देखल घेत अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय व केंद्रीय वित्त मंत्रालय यांच्याबरोबर दोन वेळेस दिल्ली येथे जाऊन संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली होती. तसेच हा अतिरिक्त अधिभार रद्द करण्याची मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे केली होती. बापट यांच्या मागणीची दखल घेऊन प्रधान यांनी काल राज्यावर असलेला अतिरिक्त अधिभार रद्द करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या कालच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी झाले आहेत.
पेट्रोल व डिझेल व्यतिरिक्त महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या इतर १४ पेट्रोलजन्य पदार्थांवरील अतिरिक्त अधिभारासंदर्भात बापट यांनी केंद्रीय मंत्री प्रधान यांना दिल्ली भेटीत माहिती दिली व या पदार्थांवरील अतिरिक्त अधिभार कमी करावा, अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment