मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या अभियंताना होणार्या मारहाण प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईस पालिका आयुक्तांनीही हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच डॉक्टरांपाठोपाठ अभियंताना होणार्या मारहाण प्रकरणात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे, अशी सकारात्मक प्रतिक्रीया पालिकेच्या अभियंता जॉइन्ट ॲक्शन कमिटीने व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवसेना नगरसेवकाने पालिका अभियंताला केलेल्या मारहाण प्रकरणी आज जी नॉर्थ वॉर्डात कर्मचारी, अधिकार्यांसोब त अभियंतानी बंद पुकारला होता. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी अद्याप शिवसेना नगरसेवकाला अटक करण्यात आलेली नाही. शिवसेना नगरसेवक राजेंद्र सुर्यवंशी यांनी उप अभियंता प्रीतम वनारसे यांना पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डातील सहाय्यक आयुक्तांच्या समोर मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी वनारसे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
पालिकेच्या अभियंताना नगरसेवक अथवा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनही मारहाण होत असल्याचे प्रकार कित्येक वर्ष घडत असून आतापर्यंत 12-15 वेळा अभियंताना मारहाण झाल्याची घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक घटनेनंतर अभियंताच्या संघटनेने बंद पुकारला आहे. पण बंदाची हाक दिल्यानंतरही मारहाण होण्याच्या घटना काही कमी झालेल्या नसून दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे डॉक्टरांना मारहाण प्रकरणी जसे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची कारवाई करता येते त्याप्रमाणे अभियंताना मारहाण झाल्यास अशाच प्रकारची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अभियंताच्या जॉइन्ट ॲक्शन कमिटीने उचलून धरली आहे. पण या मागणीवर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, काल अभियंताला झालेल्या मारहाण प्रकरणी आज अभियंताच्या जॉइन्ट ॲक्शन कमिटीने पालिका आयुक्त अजोय मेह ता यांची पालिका मुख्यालयात जाउन भेट घेतली. यावेळी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा एकदा अभियंतानी आयुक्तांसमोर ठेवली. माजी पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वत शासनाला पत्र व्यवहार करुन अभियंता मारहाण प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच यासंबंधी मुख्यमंत्र्याकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या पत्र व्यवहारावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मु ख्यमंत्र्यांनी अभियंता मारहाण संबंधी अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईसाठी नगर विकास खात्याला कळविले आहे, अशी माहिती अभियंता जॉइन्ट ॲक्शन कमिटीचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी आयुक्तांना यावेळी दिली. आयुक्त मेहता यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे लवकरच अभियंता मारहाण प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल होण्याची कारवाई होउ शकते, असा विश्वास राजाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment