करकरे यांच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2016

करकरे यांच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा

मुंबई - मुंबईवरील अतिरेकी हल्ला परतवून लावताना वीरमरण आलेले "एटीएस‘चे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर ठपका ठेवून त्यांना अपमानित केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणाबाबत करकरे यांनी केलेल्या चौकशीचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. 


गांधी भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगाव बॉंबस्फोट खटल्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की हेमंत करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भाजपने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेटदेखील घेतली होती. या भेटीनंतर मनमोहनसिंग यांनी वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवानी यांच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबींची माहिती त्यांना दिली. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे लालकृष्ण अडवानी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत, याकडे मोहन प्रकाश यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. 

करकरे यांच्या तपासावर अयोग्य आक्षेप घेतले जात असताना अडवानी यांनी मौन न बाळगता त्या वेळी त्यांना कोणती माहिती कळाली होती हे जाहीर करावे, अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली. मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी भाजपच्या एका वरिष्ठ विद्यमान मंत्र्यासह मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचा गौप्यस्फोट मोहन प्रकाश यांनी या वेळी केला. एवढेच नव्हे तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जिवालाही धोका असल्याचेही करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते, असा दावा त्यांनी केला.

देशाचे माजी गृहसचिव आर. के. सिंह यांनी पदावर असताना "भगवा दहशतवाद‘ हा शब्द सर्वप्रथम वापरला होता. त्या शब्दावर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला होता. तेच आर. के. सिंह आज भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आर. के. सिंह यांच्याकडून त्यांना
"भगवा दहशतवाद‘ हा शब्द का वापरावा लागला, याची माहिती जाणून घेतली पाहिजे, असा टोलाही महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी लगावला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad