मुंबई, दि. 30 : राज्यात स्वाईन फ्ल्यू, हिवतापाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली असून मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसीसवर मात करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र मोहीम हाती घ्यावी. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
मंत्रालयात साथ रोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची बैठक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. मोहन जाधव आदी उपस्थित होते.
राज्यातील जलजन्य, कीटकजन्य व हिवताप रोगाबाबत आढावा घेऊन डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत मोफत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम जाणवला असून गेल्या वर्षी स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या 5,262 एवढी होती. ती यावर्षी मे अखेरपर्यंत 68 एवढी झाली आहे. राज्य शासनाने जाणीव जागृतीबरोबरच लसीकरण मोहिमेवर भर दिल्याने स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या घटली आहे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले की, राज्य शासनाच्या या लसीकरण मोहिमेची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. संसर्गजन्य आजारांवर विशेष उपचार करण्यासाठी प्रत्येक विभागात संसर्गजन्य आजार उपचार रुग्णालये सुरु करण्यासाठी शासन विचाराधीन आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
राज्यात हिवताप रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 टक्के घट झाली असून गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रायगड आणि ठाणे या पाच जिल्ह्यात एकूण 4619 रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 14 टक्के रुग्ण कमी आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत हिवताप उच्चाटनाचा निर्धार केला असून महाराष्ट्रात 2025 पर्यंत हिवताप उच्चाटन करण्याचा निर्धार केला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या यावर्षी वाढली असून मुंबईमध्ये डेंग्यू नियंत्रणात असून कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, महाड, नाशिक या ठिकाणी डेंग्यूचे उगमस्थान वाढले आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयात साथीच्या आजारांना उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवावेत, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरवर्षीप्रमाणे जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा करावा त्यामध्ये विविध उपक्रमांद्वारे हिवताप व अन्य कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी. जिल्हा, तालुका गाव पातळीवर विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. यंदा जूनमध्ये ‘एक दिवस एक कार्यक्रम’ या उपक्रमांतर्गत कार्यशाळा, आरोग्य शिबिर, ग्रामसभा, सर्वेक्षण आदी उपक्रम राबवून हिवताप प्रतिरोध महिना यशस्वी राबवावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तबेले मालकांना गुरांचे लसीकरण करण्याबाबत नोटीस द्यावी. त्याचबरोबर गेल्या वर्षी या आजारामुळे जी बाधित ठिकाणे आहेत, तेथे विशेष मोहीम हाती घ्यावी. मुंबईबरोबरच सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागातही लेप्टोच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिल्या. या भागातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या कोरड्या झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या शुध्दीकरणाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी यंत्रणेने आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment