मुंबई / प्रतिनिधी / 21 May 2016- भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगराची ओळख संपूर्ण जगभर आहे. जागतिक स्तरावरील बृहन्मुंबईचे स्थान लक्षात घेता बृहन्मुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बांधकामे होत असतात. काही वेळा परवाना न घेता ही बांधकामे केली जातात, असे आढळून येते. अशा अनधिकृत बांधकामावर आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबतची अद्ययावत माहिती प्राप्त होण्याकरीता संगणक प्रणाली विकसित केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर B & F Software या लिंकवर ही प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. या संगणक प्रणालीचे संकेतस्थळ www.removalofencroachment.mcgm.gov.in आहे.
या संगणकीय प्रणालीबाबत सांगताना महापालिकेचे उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्री. मिलीन सावंत म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशात आपल्या कर्तृत्त्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक संगणकीय प्रणाली विकसित झालेल्या आहेत. बृहन्मुंबई क्षेत्राची भौगोलिक स्थिती पाहता या ठिकाणी बांधकामांवर नियंत्रण व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन होणे अत्यावश्यक आहे. या संगणकीय प्रणालीतून अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण व बांधकाम नियमांचे पालन होते की नाही, याचा प्रत्यय येणार आहे. नागरिकांनीही या प्रणालीचा वापर करुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने श्री. मिलीन सावंत यांनी केले आहे.
या संगणकीय प्रणालीचा उपयोग करुन व संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिक / तक्रारदार अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाबाबतची तक्रार केव्हाही नोंदवू शकतात. त्याकरीता तक्रारदारास संकेतस्थळावर स्वतः नोंदणीकृत होणे गरजेचे आहे. काही तक्रारदार खोटय़ा तक्रारी देतात, असे प्रकार टाळण्यासाठी तक्रारदाराचे ओळखपत्र पुरावा म्हणून दाखल करणे गरजेचे आहे.
तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेले अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण ज्या विभाग कार्यालयाच्या हद्दीत असेल त्या विभाग कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱयापर्यंत तक्रार पोहचेल व याबाबतची माहितीही तक्रारदारास संदेशाद्वारे पोहचविण्यात येणार आहे. त्यासोबतच तक्रारदार / नागरिकांनी केलेल्या तक्रारीबाबत प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने वेळोवेळी माहिती पोहचविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामे / अतिक्रमण यासाठीच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विभाग कार्यालयातील तक्रार निवारण अधिकारी ते मुख्यालयातील महापालिका आयुक्त, विधी अधिकारी यांना संगणक प्रणालीत नोंद झालेल्या तक्रारीचा तपशिल पाहता येणार आहे. प्राप्त झालेली तक्रार कोणत्या अधिकाऱयाकडे व कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, हे तक्रारदार व वरिष्ठ अधिकारी यांना संकेतस्थळावर समजू शकणार आहे. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा तपशिल वरिष्ठांना आपोआप संगणकीय प्रणालीने समजू शकल्यामुळे यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे. यासोबतच कोणत्या विभाग कार्यालयाकडून, अधिकाऱयाकडून किती अनधिकृत बांधकामावर वेळेत कारवाई झाली याची माहिती वरिष्ठांना या प्रणालीच्या माध्यमातून समजू शकणार आहे.
अनधिकृत बांधकामे / अतिक्रमण याबाबतच्या संगणकीय प्रणालीमध्ये तक्रार Google Map शी जोडली असल्यामुळे व्यवसायिक तक्रारदारांची नावासहीत नोंद राहणार आहे. याबाबत प्रशासनाकडून तक्रारदाराबाबत गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील वाढती बांधकामे व इतर बाबी पाहता ही संगणकीय प्रणाली अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे यावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तम मार्ग असणार आहे.
माहिती अधिकार अधिनियम – २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांत सर्वाधिक तक्रारी बांधकामे व अतिक्रमणे या संदर्भात असतात. ही संगणकीय प्रणाली विकसित केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणून महापालिकेस प्राप्त होणारे माहिती अधिकाराचे अर्जही कमी स्वरुपात येतील, अशी माहिती उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्री. मिलीन सावंत यांनी दिली.
No comments:
Post a Comment