मुंबई, दि. १९ : हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण त्याबरोबरच पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने राज्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
राज्यभरात मान्सूनपूर्व तयारीसाठी करावयाच्या उपाययोजनांसदर्भात आढावा घेण्यासाठी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन ऑथरिटीची बैठक झाली,त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, सैन्य दलाचे ब्रिगेडियर आर. के. गायकवाड,नौदलाचे रिअर ॲडमिरल एस. एन घोरमाडे, वायुसेनेचे सी. नंदकिशोर,मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आय. ए. कुंदन, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल यांच्यासह राज्यातील महसूल विभागांचे आयुक्त, मुंबई क्षेत्रातील महापालिकांचे आयुक्त, तटरक्षक दल, एनडीआरएफ, प्रादेशिक हवामान विभाग आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत नाले सफाईस सर्वोच्च प्राधान्य द्यावे
मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्यात मुंबई शहरात उपनगरीय रेल्वे कोणत्याही परिस्थितीत बंद पडता कामा नये, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. यासाठी रेल्वे आणि एमएमआर रिजनमधील सर्व महापालिकांनी समन्वयाने काम करावे. नाल्यांच्या सफाईच्या कामास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. समुद्रात उंच लाटा आणि त्याच दिवशी मोठ्या पावसाचा अंदाज असल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी. हवामान खात्याने याबाबतीत अधिक अचूक माहिती द्यावी, जेणेकरुन संबंधीत यंत्रणांना चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल, असे ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अधिक अचूक अशा माहितीपुस्तिका तयार करुन घ्याव्यात. आपत्तीच्या काळात लोकांपर्यंत लवकरात लवकर माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील धरणांमधील पाण्याचे चोख व्यवस्थापन करण्यात यावे. यासाठी आंतरविभागीय तसेच आंतरराज्यीय समन्वयावर भर देण्यात यावा. धरणाच्या पाण्यामुळे एखाद्या भागात पुरस्थिती निर्माण होणार नाही, यादृष्टीने दक्षता घेण्यात यावी. राज्यातील अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागात मोठ्या पावसाच्या काळात अनेक गावांचा संपर्क तुटतो. अनेक भागात वीज पुरवठ्यातही अडथळे येतात. अशा गावांपर्यंत मदत पोहोचविणे व अशी गावे लवकरात लवकर संपर्कात आणण्याच्या दृष्टीने त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
आपत्ती निवारणासाठी सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात – मुख्य सचिव
मुख्य सचिव क्षत्रिय म्हणाले की, पावसाळ्याच्या काळातील आपत्ती निवारणासाठी पूर्व प्रशिक्षणे, मॉक ड्रिल, पूर्व सूचना यंत्रणा,तात्पुरते निवारे, अन्न व औषधांची मुबलक उपलब्धता, हॅम रेडिओ ऑपरेटर्स अशा विविध यंत्रणा उपलब्ध करण्यावर आणि उपाययोजनांवर प्राधान्याने भर द्यावा. सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात. धरणांमधील पाणी अडविणे किंवा सोडणे यासाठी शेजारचे जिल्हे, राज्य यांच्याशी समन्वय ठेवून व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात यावा, जेणेकरुन त्यामुळे राज्याच्या कोणत्याही भागात पूरस्थिती उद्भवणार नाही, यादृष्टीने दक्षता घेण्यात यावी. मुंबई परिसरात मिठी नदीसह नाल्यांची सफाई वेळेत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी याप्रसंगी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि धोरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment