मुंबई, दि. 17 : पर्यावरण संवर्धनासाठी सर्व कंपन्यांनी कंपन्यांच्या आवारात, तसेच सभोवतालच्या परिसरात वृक्षारोपण करावे, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषण रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील बांधकाम परवानगी व बांधकामांबाबत निर्णय घेणे, पनवेल येथील पास्को कंपनीतील माथाडी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श्री. पोटे-पाटील बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर, तसेच पास्को कंपनीचे व्यवस्थापक व कामगार आदी उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकांनी घनकच-याच्या व्यवस्थापनासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. घनकचरा व्यवस्थापनाबाबतीत नियमभंग केल्यास कारवाई केली जाईल, असे श्री. पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले. पास्को कंपनीतून कामावरुन कमी करण्यात आलेल्या 30 कामगारांना पुन्हा रोजगार देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पास्को कंपनीलगत असलेला तलाव स्वच्छ करुन जलयुक्त शिवार योजनेला सहकार्य करावे. तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांची तपासणी व्हावी व तेथील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते इतर कामांसाठी वापरण्यात यावे जेणेकरुन पाण्याचे प्रदूषण टळून पर्यावरणाचे संवर्धन होईल, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment