मुंबई, दि. १३ : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या १००० कामांपैकी ८१० कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च २०१७ पूर्वी पूर्ण करावीत .तसेच, नव्याने ११०० विकास कामांचे येत्या पावसाळ्यातच नियोजन करून या कामांना १ नोव्हेंबर २०१६ रोजी सुरुवात करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयातील पाटील यांच्या दालनात राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव (रस्ते) तामसेकर, सचिव (बांधकाम) डी.पी.जोशी, सर्व विभागातील मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता संघटना व राजपत्रित अभियंता संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कंत्राटदारांची निवड सूची तयार करा
इतर क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या कंत्राटदारांना बांधकाम क्षेत्रात आणण्याच्या प्रयत्न करावा, असे सांगून पाटील म्हणाले, रस्त्यातील खड्डे भरण्याच्या कामाची प्रक्रिया ब-याचदा लांबत जाते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेवून खड्डे वेळीच भरण्याच्या कामांना गती यावी, यासाठी कंत्राटदारांची निवड सूची तयार करून मुख्य अभियंता यांच्यामार्फत कामे देण्यात यावीत.
कामांची स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी
अनेकवेळा बांधकाम न करता कंत्राटदार कामांची बोगस बिले सादर करतात अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामांची स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी. कामे प्रत्यक्षात झाल्याची खात्री न करताच कामाची बिले अदा केल्याचे आढळल्यास यात मुख्य अभियंता यांना जबाबदार समजले जाईल.
"जाहिरात धोरण" निश्चितीच्या प्रक्रियेला गती द्या
रस्त्याच्या दुतर्फा जाहिरात फलक उपलब्ध केल्यास अधिकचा महसूल मिळविता येईल, त्यामुळे सार्वजानिक बांधकाम विभागाच्या जाहिरात धोरण निश्चितीच्या प्रक्रियेला गती द्यावी.
"जनसुविधा केंद्र" उभारण्यास सुरुवात करा
मा.पंतप्रधान यांच्या 'स्वच्छ भारत अभियाना’च्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत (राज्यमार्ग) महिलांसाठी स्वच्छतागृहे, जनसुविधा केंद्र उपलब्ध करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या प्रायोगिक तत्वावर ज्या रस्त्यांवर जास्त प्रमाणात वाहतूक होते अशा मार्गावर "जनसुविधा केंद्र" व महिला स्वच्छतागृह उभारण्यास सुरुवात करावी, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे
काही भागात अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले,वाहनांवर दगडफेक, शिवीगाळ केली जाते.अशावेळी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी पिडीत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. शासनाच्या मालकीच्या वापरात नसलेल्या जमीनींचा वाणिज्यिक तत्त्वावर विकास करुन त्यातून मिळणाऱ्या महसूलात लोकापोयोगी कामे करता येणार असून अशा जमीनींची तपासणी करण्याचे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.
दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकाच जिल्ह्यात सेवा केलेल्या कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांच्या सन २०१६ मध्ये जिल्ह्याबाहेर बदली करण्याचा निर्णयही पाटील यांनी यावेळी घेतला. तसेच निविदा लिपिक, लेखापरीक्षक, मैल मजूर, रोड कारकून, कनिष्ठ अभियंता व इतर निम्नस्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्य अभियंत्यांनी कार्यवाही करावी. त्याचबरोबर प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता यांच्या अधिपत्याखालील विभागीय पदांचा आढावा घेऊन त्यांची पुनर्रचना करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री.पाटील यांनी मुख्य अभियंत्यांना दिल्या.
No comments:
Post a Comment