मुंबई / 24 May 2016
महाराष्ट्र शासन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या या धोरणानुसार शासनातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे.
ही शिष्यवृत्ती परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थी व विद्यार्थींनींना देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याचे वय 35 वर्षे तर पीएचडीसाठी 40 वर्षे पर्यंत असावे. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लाखापेक्षा जास्त नसावे.
परंतु जागतिक क्रमवारीतील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही. उमेदवार हे पदवी/पदव्युत्तर पदवी प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. तसेच परदेशातील शिक्षण संस्थेत मान्य अभ्यासक्रमातील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 300 च्या आत असावी.
या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो. अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी 14 हजार अमेरिकन डॉलर तर इंग्लंडसाठी 9 हजार पौंड इतका वार्षिक निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांस देण्यात येतो. याशिवाय आकस्मिक खर्चासाठी अमेरिका व इतर देशासाठी 1375 अमेरिकन डॉलर तर इंग्लंडसाठी 1 हजार पौंड डॉलर देण्यात येतात. यामध्ये पुस्तिका, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा समावेश आहे. परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांस मंजूर करण्यात येतो.
No comments:
Post a Comment