मुंबई, दि. 11 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये ‘एसएनडीटी’चे अमूल्य योगदान असून आगामी काळात शैक्षणिक व सामाजिक कार्यात सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी शासन विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात तावडे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
अर्थसंकल्पामध्ये महिला विद्यापीठासाठी वेगळे शीर्ष निर्माण करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यापीठाला थेट अनुदान प्राप्त होणार आहे. आगामी तीन वर्षासाठी 75 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे शासनाने निश्चित केले असून यामुळे विद्यापीठाच्या प्रगतीला हातभार लागणार आहे, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
‘भारतरत्न महर्षी कर्वे : एक युगपुरुष’ या कॉफीटेबल बुकचे व महर्षी कर्वे यांच्यासोबत कार्य करणाऱ्या 70 महिलांची माहिती असलेले ‘तेजोनिधीच्या तेजशलाका’ या पुस्तकाचे तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘महर्षी कर्वे सेमिनार कॅम्पस’चे उद्घाटनही यावेळी झाले. विद्यापीठाच्या कुलगुरु प्रो.वसुधा कामत, उपकुलगुरु प्रा. वंदना चक्रवर्ती तसेच विद्यापीठाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment