मुंबई, दि. 23 : खाजगी धर्मादाय रूग्णालयांत गरीब रूग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी शासनाने नेमलेल्या आरोग्य सेवकांना रूग्णालयातील प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त रूग्णांपर्यत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी धर्मादाय रूग्णालय आणि प्रशासन यांनी समन्वयाने आणि पारदर्शकपणे कार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
शासनातर्फे गरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी धर्मादाय रूग्णालयांत आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील बैठकीचे आयोजन मंत्रालयात देसाई यांच्या दालनात करण्यात आले. त्यावेळी देसाई बोलत होते. या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, महानगरपालिका रूग्णालयाचे प्रतिनिधी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे प्रतिनिधी तसेच हिंदुजा, बॉम्बे, ब्रीच कॅण्डी, जसलोक, हरकिसनदास आदी रूग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले की, शहरातील दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना महत्त्वाच्या शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजारावर उपचार करणे अनेकदा शक्य होत नाही. या रूग्णांना गंभीर आजारावर सहज उपचार मिळावा यासाठी शहरातील रूग्णालयांनी 10 टक्के खाटा राखीव ठेवण्यासंदर्भात तरतूद आहे. रूग्णालयात येणाऱ्या गरीब रूग्णांना संबंधित योजनेची माहिती मिळावी तसेच त्यांना योग्य ते सहकार्य मिळावे यासाठी शासनाने आरोग्य सेवकांची नेमणूक केली असून, या आरोग्य सेवकांना योग्य सहकार्य करून ही योजना यशस्वी करण्यास रूग्णालयाच्या प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिले.
रूग्णालयाच्या दर्शनी भागात अद्ययावत माहिती फलक लावण्याची तसेच आरोग्य सेवकांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी एक विभागीय अधिकारी यांची नेमणूक करावी अशा सूचनाही देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच यासंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गरीब रुग्णांना शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवीन सॉफ्टवेअर बनविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जोशी यांनी दिली. यासाठी संबंधित रूग्णालय प्रशासनाच्या सूचनांचा समावेश व्हावा आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी शासन आणि रूग्णालय यांच्या सामंजस्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment