केंद्र सरकारसह विविध शासकीय परवानग्या देखील सॉफ्टवेअरला जोडण्याचे पुढील लक्ष्य
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इमारत प्रस्ताव विषयक प्रक्रिया ऑनलाईन करुन सर्व माहिती देखील पारदर्शक पद्धतीने महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे व संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. इमारत प्रस्ताव विषयक ऑनलाईन प्रक्रिया व संबंधित माहिती दि. १५ मे २०१६ पासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याने अशा प्रकारची सेवा उपलब्ध करुन देणारी बृहन्मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. या सकारात्मक बाबीची दखल आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्याने महापालिकेच्या गौरवात भरच पडली आहे.
`सेवा हमी कायदा' आणि `इझ ऑफ डुइंग बिझिनेस' या नुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील इमारत प्रस्ताव विषयक प्रक्रिया ऑनलाईन करण्यासोबतच संबंधित माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घर खरेदी करताना संबंधित इमारतीबाबत आवश्यक त्या परवानग्या विकासकाने घेतल्या आहेत किंवा नाही, याची माहिती इंटरनेट द्वारे सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच इमारत प्रस्ताव विषयक प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे विकासकांना देखील निर्धारित वेळेत व महापालिका कार्यालयात खेटे न घालता सदर परवानग्या मिळू शकणार आहेत. या सर्व बाबींची दखल आता मुख्यमंत्र्यांनी स्वत: घेतली असून याबाबतीत बृहन्मुंबई महापालिकेचे `ट्वीटर' संकेतस्थळावरील आपल्या खात्यावरुन सार्वजनिकरित्या अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर इमारत प्रस्ताव विषयक आवश्यक असणा-या केंद्र शासनाच्या विविध परवानग्या तसेच इतर संबंधित परवानग्या देखील संबंधित सॉफ्टवेअरला जोडण्याचे पुढील लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी महापालिकेला ठरवून दिल्याचे आपल्या ट्वीट मध्ये नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment