मुंबई : परळ टर्मिनस उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. टर्मिनसच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे.
एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. या कामासाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता ५१ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.
परळच्या सर्व प्लॅटफॉर्मची रुंदी दहा मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असून, एकूण पाच प्लॅटफॉर्म बांधण्यात येतील. परळच्या मध्यभागी पूर्व-पश्चिमे जोडणारा नवा पूल उभारण्यात येईल. जुन्या पुलाला मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाशी स्कायवॉकने जोडण्याचा प्रस्तावही आहे. पुलावर तिकीट घर आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.
टर्मिनस उभारताना प्रवासी सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे. ५१ कोटींपैकी तब्बल २८ कोटी रुपये प्रवासी सुविधांसाठी असल्याचे पाटील यांनी सांगितले. परळ टर्मिनसचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.
परळ टर्मिनस उभारण्यासाठी मालगाडीचा ट्रॅक तोडण्यात येणार आहे. हा ट्रॅक काढून मिळालेल्या संपूर्ण जागेत परळ टर्मिनस उभारले जाणार आहे.
टर्मिनसच्या कामात सर्वात शेवटची रूट रिले इंटरलॉकिंग सीस्टिमची कामे होतील.
त्या आधी यार्ड रिमॉडेलिंग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची कामे होणार आहेत.
कुर्ला ते सीएसटी या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम आधी पूर्ण केले जाणार होते. अनधिकृत बांधकामांमुळे, प्रथम परळ टर्मिनस पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
No comments:
Post a Comment