मुंबई, दि. 11 : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘दिल्ली हाट’ च्या धर्तीवर राज्यातील आदिवासी कला संस्कृतीच्या प्रसिध्दीसाठी पालघर जिल्ह्यात ‘वारली आदिवासी हाट’ बांधण्यात येणार आहे, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देण्याकरिता तसेच आदिवासी कारागिरांच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर येथे ‘वारली आदिवासी हाट’उभारण्यात येणार आहे. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून या प्रकल्पासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पालघरमधील राष्ट्रीय महामार्गालगतच्या मनोर येथे पर्यटन विभागाच्या जागेवर हा प्रस्तावित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 57 कोटी 85 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र व राज्य शासन देणार आहे. केंद्र शासनाने 5 कोटी रुपयांची रक्कम राज्याच्या आदिवासी विकास विभागास दिलेली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर’ दिल्ली हाट’ च्या धर्तीवर या प्रकल्पाचे पणन व व्यवस्थापन होणार आहे, असेही सवरा यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमाद्वारे राज्यातीलच नाही तर देशातील विविध भागातील आदिवासींची जीवनपद्धती तसेच त्यांचे पारंपरिक उत्सव, हस्तकलेच्या वस्तू, चित्रे, इत्यादी आदिवासी समाजाशी संबंधित वस्तूंचे दर्शन याठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामध्ये 4 दालने उभारण्यात येणार असून यामध्ये जीवनपद्धती, हस्तकला, चित्रे, हत्यारे व शस्त्र, हस्तलिखिते आदींचा समावेश असणार आहे. प्रस्तावित वर्कशॉप दालनामध्ये धातू, लाकूड, व बांबू, फोटोग्राफी, वारली पेंटिंग, नृत्य व संगीत, शेती तसेच मातीपासून वस्तू बनविणे या विषयाची कार्यशाळा पर्यटकांना स्वत: अनुभवता येणार आहे. आदिवासी कलांचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन येथील प्रस्तावित प्रेक्षागृहात केले जाणार आहे. हा संपूर्ण परिसर प्रशासकीय कार्यालय, मुख्य वर्कशॉप, गॅलरी,वाहन पार्किंग, उपहारगृहे, एव्ही सभागृह तसेच प्रदर्शनासाठी हॉल आदी सुविधांनी सुसज्ज असणार आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात विस्तारलेली वारली,गौंड, चोधरा, हलबा-हलबी, पारधी इत्यादी आदिवासी जमातीची जीवनगाथा नियोजित ‘वारली हाट’ या प्रकल्पाद्वारे जनतेसमोर येणार असून या प्रकल्पामुळे आदिवासी बांधवांच्या कला, संस्कृती जपण्याबाबत तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा राज्य शासनाचा हा पहिला प्रयत्न आहे. येत्या 2 वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल.
‘वारली हाट’द्वारे आदिवासी संस्कृती समाजील सर्व स्तरापर्यंत पोहोचणे त्याचा देशभरात तसेच देशाबाहेर प्रसार व प्रचार होणे अशा बाबी या माध्यमातून शक्य होणार आहेत. भारताच्या पश्चिम भागात विकसित व जतन झालेली वारली संस्कृती ही आज सातासमुद्रापार गेली आहे. त्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य वारली हाटद्वारे होणार आहे,असा विश्वासही यावेळी सवरा यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment