मुंबई / प्रतिनिधी 26 May 2016
बुसान भगिनी शहर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तसेच विविध नागरी सेवा – सुविधा व पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर व बुसानचे महापौर सूह ब्युंग सू यांच्यादरम्यान महापालिका मुख्यालयातील महापौर दालनांत आज (दिनांक २६ मे, २०१६) सविस्तर चर्चा करण्यात आली.
बुसानचे महापौर सूह ब्युंग सू, दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्यदूत किम सुंग यून, बुसानचे आंतरराष्ट्रीय संबंध दूत हाँग सिओंग व्हा, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक चोई गी वोन, बुसानचे चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष चो सुंग जे, बीएनके फायनान्शिअल ग्रुपचे अध्यक्ष सुंग से व्हान यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता.
महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनीही हेही या चर्चेत सहभागी झाले होते. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी म्हणाल्या की, बृहन्मुंबई व बुसान या दोन्ही शहरांदरम्यान १९७७ मध्ये भगिनी शहर संबंध प्रस्थापित झाल्यावर या दोन्ही महानगरांमधील या संबंधांना आता ४० वर्षे पूर्ण होत आहेत. ही दोन्ही शहरे आणि त्यांच्या देशांनी या चाळीस वर्षांदरम्यान मोठी प्रगती साध्य केली आहे.
येत्या कालावधीत सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापारी व तांत्रिक देवाणघेवाणीकरीता जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील, असे महापौर श्रीमती आंबेकर यांनी नमूद केले. सागरी किनारा मार्ग, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर, सागरी किनारा क्षेत्रांत पर्यटनस्थळांचा विकास करणे आदी मुद्यांवर सहकार्य करण्याविषयीही दोन्ही बाजुंनी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment