मुंबई, दि. 27 : लोककलाकारांची पारंपरिक संस्कृती राज्यातील १२ कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडिया आणि ‘व्हाट्स ॲप’ हे एक उत्तम माध्यम असून यावर लोककलाकाराला मिळालेला पुरस्कार आणि त्याची कला यांचा एक माहितीपट बनवून लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतर या कलांचा प्रसार अधिकाधिक होईल. याशिवाय तमाशा कलावंताकडून होणाऱ्या तमाशा महोत्सवाच्या मागणीवर विचार करून राज्य सांस्कृतिक विभागामार्फत तमाशा फडांची स्पर्धा राज्यात आयोजित केली जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
रविंद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटरमध्ये आयोजित प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांच्या सहाय्यक अनुदान वितरण कार्यक्रमात तावडे बोलत होते. यावेळी प्रभारी संचालक संजय पाटील, उपसचिव संजय भोकरे आदी उपस्थित होते.
तावडे यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लोककलावंतांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा आणि कलावंतांची कला टिकविण्यासाठी शासनाकडून कलाकारांप्रती असलेली प्रतिबद्धता जाणून घेतली. यावेळी अनुदानप्राप्त तब्बल ३६ संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या तावडे यांच्यासमोर मांडल्या. यात मंगला बनसोडे यांनी शासनाकडून राज्यभरात होणारे तमाशा महोत्सव मुंबई वगळता अन्य ठिकाणी बंद करण्यात आल्यामुळे तमाशा कलाकाराला स्पर्धेत उतरता येत नसल्याची खंत बोलून दाखविली. यावर तावडे यांनी राज्य सांस्कृतिक विभागामार्फत तमाशा फडांची स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय स्व.वसंतराव चांदोरकर मेमोरिअल ट्रस्टचे दीपक चांदोरकर यांनी केंद्र सरकारकडून संस्कृतीचे जतन करणाऱ्या संस्थांना दिले जाणारे अनुदान हे राज्यातील संस्थांपर्यंत पोहोचले जात नसल्याची खंत व्यक्त केल्यानंतर याबाबत ही राज्य सरकारकडून विचार करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले.
यावेळी ग्रामीण भागातील तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी इत्यादीसारख्या कला सादर करणाऱ्या लोककलांच्या ३६ कलापथकांना अनुदान वितरित करण्यात आले. २०१५-१६ यावर्षी राज्यातून तब्बल ४४७ संस्थांनी अर्ज केले होते. यातून त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारीप्रमाणे अर्थसहाय्य प्रतिवर्षी मंजूर करून ३६ संस्थांना ४१ लाख ५० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. याबरोबरच शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना पं.भीमसेन जोशी यांच्या नावे आर्थिक सहाय्य योजना दिली गेली.
No comments:
Post a Comment