मुंबई : इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कामगार संघटनांनी बुधवारी कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. आरोग्य विम्याबरोबरच अनेक सवलतींपासून कामगारांना वंचित ठेवल्याबाबत संघटनांनी आयुक्तांना निवेदन दिले.
इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाकडे कोट्यवधींचा निधी जमा झाला आहे. मात्र, नऊ महिन्यांपासून कामगारांची समूह आरोग्य विमा बंद झाली आहे. त्याबाबत केवळ बैठका होतात. मात्र, निर्णय होत नाही, अशी खंत अहमदनगर जिल्हा बांधकाम मजूर संघटना महासंघाचे सदस्य कर्णसिंह घुले यांनी व्यक्त केली. जयेश कांबळे, अनिता कोंडा, अमिना शेख, राजेंद्र थोरात, नंदू डहाणे, अशोक उगलमुगले आदी कामगार संघटनांचे प्रतिनिधी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
गृहोपयोगी वस्तूंपोटीचे तीन हजार रुपये कामगारांच्या खात्यात वर्ग करण्यात यावेत, विविध प्रस्तावांचा निधी तातडीने कामगार संघटनांना मिळावा, आरोग्य विमा योजना सुरू करावी, अवजारे खरेदीसाठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपायुक्त कुलकर्णी यांनी दिले.
No comments:
Post a Comment