मुंबई: १९ मे / प्रतिनिधी -मुंबईतील नालेसफाईची कामे अतिशय संथ गतीने सुरू असून याच धीम्या गतीने कामे सुरू राहिल्यास पावसाळ्यापुर्वीची नालेसफाईची डेडलाईन पाळता येणे अशक्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबण्याचा धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. गुरूवारी मुंबईच्या पुर्व आणि पश्चिम उपनगरातील काही प्रमुख नाल्यांचा पाहणी दौरा केल्यानंतर ते बोलत होते.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या वतीने अहिर यांच्या नेतृत्वाखाली एका पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी घाटकोपर पुर्व आणि पश्चिम, पोयसर नाला, दहिसर पश्चिम, मालाड पुर्व आणि मालाड लिंक रोड या परिसरातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी अहिर यांच्या समवेत माजी खासदार संजय पाटील, महापालिकेतील गटनेते धनंजय पिसाळ, हारून खान, संध्या जोशी, राखी जाधव आणि सुरेखा पेडणेकर आदी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक आणि सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अहिर म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही सुरू केलेल्या पाठपुराव्यामुळे काही भागात नालेसफाईच्या कामांना सुरूवात झालेली आहे. मात्र ही कामे अतिशय धीम्या गतीने सुरू असून पावसाळ्यापुर्वी ती पुर्ण होणे जवळपास अशक्य आहे.त्यामुळे या कामांना अजून वेग देण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच वेळेत कामे पुर्ण न झाल्यास याच नाल्यांमधील गाळ सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या कार्यालयासमोर अाणून टाकण्याच्या आपल्या आंदोलनाचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
No comments:
Post a Comment