मुंबई, दि. 20 : यावर्षीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीईटी परिक्षेद्वारेच देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राने नीटबाबत मांडलेल्या भूमिकेला केंद्र सरकारने पाठिंबा दिला. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला असून याबाबतचा अध्यादेशही निघणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केंद्राने राज्याच्या भूमिकेला पाठिंबा देऊन तसा निर्णय घेतल्याबद्दल श्री. तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, वेंकय्या नायडू, स्मृती इराणी यांचे आभार मानले.
महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 2810 जागांवरील प्रवेशाचा मार्ग यामुळे मोकळा झाला असल्याचे श्री. तावडे यावेळी म्हणाले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 1720 व अभिमत विद्यापीठातील 1675 अशा एकूण 3395 जागा या नीटद्वारेच भरल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होणार आहे. एनसीईआरटीच्या नियमाप्रमाणेच एचएससी व सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. अकरावी व बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवरच नीटची प्रश्नपत्रिका तयार होते. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून येणाऱ्या नीटच्या पार्श्वभूमीवर आपण उच्च माध्यमिक (एचएससी) बोर्डाच्या अध्यक्षांना अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत काय बदल करता येऊ शकेल याबाबत शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेण्याची सूचना केली आहे.
30 एप्रिल पासून नीटबाबत राज्य सरकारने वेळोवेळी आपली भूमिका मांडून विविध राज्यांच्या मंत्र्यासोबत, विद्यार्थी व पालकांसोबत बैठका घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच याबाबतचा सकारात्मक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment