मुंबई, दि. 12 : पुढील पाच वर्षांत भारतीय नागरिकांचे सरासरी वय 29 वर्षे असणार आहे. त्यामुळे भारत हा सर्वाधिक युवकांचा देश म्हणून गणला जाणार आहे. संगीत, साहित्य, चित्रपट, कला, क्रीडा या क्षेत्रातील युवारत्न शोधून सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कारामध्ये यापुढे ‘युवारत्न’ पुरस्काराचा समावेश करावा, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीच्या 15 व्या नवरत्न पुरस्कारांचे आज राज्यपाल के.विद्यासागर राव यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिर येथे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, प्रसारभारतीचे सदस्य अनुप जलोटा, सुनील अलग, अभिनेत्री जुही चावला, गोदरेज उद्योगसमूहाचे प्रदीप उघडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, सह्याद्री नवरत्न पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक क्षेत्रातील रत्न शोधून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. शेती आणि जलसंधारणाच्या कामात जैन इरिगेशन समूहाने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठासोबत काम करुन या क्षेत्राच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष (साहित्यरत्न), गायक रामदास कामत (नाट्यरत्न), संगीतकार अजय-अतुल (संगीतरत्न), डॉ. विजया वाड (शिक्षणतज्ज्ञ), राधाकृष्ण नार्वेकर (रत्नदर्पण),उद्योजक अनिल जैन (वैभवरत्न), विजय फळणीकर (सेवारत्न), अच्युत पालव (कलारत्न) यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांना देण्यात आलेला चित्ररत्न पुरस्कार त्यांच्या वतीने मुकेश शर्मा यांनी स्वीकारला. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला ‘फेस ऑफ इयर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment