मुंबई / प्रतिनिधी 27 May 2016 : मुंबईमध्ये अनधिकृतपणे सत्ताधारी शिवसेनेच्या शिववडाच्या गाड्या आहेत. शिवसेनेच्या या शिववडाच्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने "नमो टी स्टॉल व नमो फुड्स स्टॉल" सुरू करण्याचा प्रस्ताव भाजपाचे सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी मांडला़. मात्र शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसची कांदेपोहे योजना लटकली असताना ही योजना मंजूर करण्याचे आव्हान भाजपापुढे असणार आहे़
२००९ मध्ये सेनेने शिववडा योजनेची घोषणा केली होती़ मात्र अद्यापही या योजनेला मंजुरी मिळालेली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या शिववड्याच्या गाड्या बेकायदा ठरत आहेत़ शिवसेनेला आव्हान देण्यासाठी काँग्रेसनेही कांदेपोहे स्टॉल्सची घोषणा केली़ मात्र अशा योजना या केवळ निवडणुकीच्या काळातील स्टंटबाजी ठरल्या़ अशीच एक घोषणा आता भाजपाकडून होऊ लागली आहे़ सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला़ त्यानुसार फेरीवाले व सुशिक्षित बेरोजगारांच्या उपजीविकेसाठी ही योजना दिलासादायी ठरेल, असा दावा भाजपाने केला आहे़ या स्टॉलवर शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसचे कांदेपोहेही मिळतील, असा टोला भाजपा नेत्यांनी लगावला आहे़ मात्र आयुक्तांच्या अभिप्रायानंतरच या योजनेचे भवितव्य ठरणार आहे़.
हे स्टॉल चार बाय चार, चार बाय सहा आणि सहा बाय आठ अशा आकारामध्ये असतील़ अॅल्युमिनियम आणि लोखंड या धातंूनी बनवलेले हे स्टॉल्स असतील़ सौरऊर्जेवर वीज निर्माण करण्याची व्यवस्था असेल़. रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाऊन मुंबईकरांचे आरोग्य बिघडते़ मात्र या स्टॉल्सच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्टॉलधारकाची असणार आहे़ तसेच स्टॉल्सच्या आसपास पुरेशी मोकळी जागा असेल, वृक्षारोपण करून त्यांची निगा राखण्याची जबाबदारी स्टॉलधारकावर असणार आहे, असा दावा भाजपाने केला आहे़
स्टॉल्ससाठी कर्जही उपलब्ध
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे व्यवसायासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमधून आर्र्थिक मदत मिळू शकणार आहे़ प्रत्येक स्टॉल तीन ते चार जणांना रोजगार मिळवून देईल़.
भाजपा हा स्टंट करणारा पक्ष आहे़ असे विषय चर्चेत आणून प्रसिद्धीत राहण्याचा या पक्षाचा प्रयत्न सुरू असतो़.
- प्रवीण छेडा, विरोधी पक्षनेते
शिवसेनेच्या शिववडा योजनेला अद्याप परवानगी मिळाली नाही़ म्हणून बेकायदा स्टॉल्स टाकण्यात आले आहेत़ नमो चहा स्टॉल्सचे भवितव्य याहून निराळे नाही़.
- रईस शेख, गटनेते, समाजवादी पक्ष
मुंबईमधील रस्ते आधीच फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येत असतात नमो टी स्टॉल व नमो फुड्स स्टॉल मुळे यात भर पडणार आहे. मुंबईचे रस्ते पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहिले पाहिजेत.
- चेतन कदम, मनसे नगरसेवक
No comments:
Post a Comment