मुंबई, दि. २६ : औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असून यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विद्यापीठ प्रशासनाला सांगितले. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामविकासाला चालना देणारी ही संस्था स्थापन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
विधानभवनात आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही संस्था सुरु करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे सांगितले. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, प्रा. डॉ. सर्जेराव ठोंबरे, प्रा. गजाजन सानप, प्रा. डॉ. अजित थेटे,डॉ. गणेश मंझा आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्थेमार्फत ग्रामीण विकासाकरीता संशोधन करण्याबरोबरच विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार असून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम चालविले जातील. पंचायतराज संस्थांमधील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या क्षमता बांधणीसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येईल. आदर्श खेडी तयार करण्यासाठी या संस्थेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येतील. यासाठी विद्यापीठाने ग्रामविकास क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील नामांकित संस्थांचा अभ्यास केला आहे. त्यास अनुसरुन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करण्याचे प्रस्तावित केले आहे. आज झालेल्या बैठकीत विद्यापीठामार्फत या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment