मुंबई / प्रतिनिधी - आरे वसाहतीतील आदीवासी पाड्यातील शौचालयाचे बांधकाम महापालिका प्रशासनातर्फे सुरु करण्यात आले असले तरी हे बांधकाम गेले अडीच वर्ष शासनाच्या लालफीतीत अडकून बसले आहे. आरेच्या आदीवासी पाडयात आणि झोपडपट्टी विभागात शौचालयाचे बांधकाम झाले तर याचा लाभ सुमारे 5 हजार रहीवाशांना मिळू शकतो.
आरे येथे गौतम नगर, दुर्गापूर, गणेश नगर, केतकी पाडा आणि सारीपुत्र येथील ठिकाणींसाठी शिवसेना नगरसेवक आणि स्थापत्य समिती उपनगरचे अध्यक्ष अंनत नर यांनी तीन शौचालय महापालिका प्रशासनातर्फे बांधण्यास सुरुवात केली होती. या संबंध नगर आणि आदीवासी पाड्यात सुमारे 5 हजार लोकवस्ती आहे. पण इतक्या मोठ्याप्रमाणात लोकसंख्या असूनही शौचालयाची सुविधा नव्हती. त्यामुळे नगरसेवक नर यांनी अडीच वर्षापूर्वी येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधण्यास सुरुवात केली होती. महापालिका तर्फे शौचालयाचे बांधकाम सुरु असतानाच महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी आरे येथे नॉन डेव्हलपमेंट झोन असल्याने शौचालयाचे बांधकाम करण्यास रोखले. यासंदर्भात 11 जानेवारी 2016 रोजी नगरसेवक नर आणि गृहराज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. त्यानंतर शौचालय बांधण्यास मिळावे याकरीता 11 एप्रिल 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांनी आरे येथे शौचालय बांधण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती नगरसेवक नर यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतरही लालफितीतच शौचालयाच्या बांधकाम अडकल्याची माहिती नर यांनी दिली.
No comments:
Post a Comment