मुंबई, दि.२७ : पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजनांसह भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठीही राज्य शासनाकडून भर देण्यात येत आहे. पाण्याचे स्त्रोत बळकट करुन कायमस्वरुपी पाणी साठा निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बोअरवेल खोदण्यासह टंचाईची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी विहीर खोदाईच्या कामास प्राधान्य देण्यात येत आहे.
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे जिल्हा वार्षिक योजना नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी खरेदी केलेल्या एक्सव्हेटर यंत्रसामग्री लोकार्पण सोहळा आणि जलयुक्त शिवार योजनेतून शिवकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. खडपोली येथील शिवकालीन तलावाचा गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढल्यानंतर तलावाची क्षमता 620दशलक्ष लिटरवरुन एक हजार 770 दशलक्ष लीटरपर्यंत वाढणार आहे. शिवाय तलावाच्या परिसरातील विहीरी, बोअरवेल यांची पाणी पातळीसुद्धा वाढणार आहे.
पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत चिपळूणमध्ये नाविण्यपूर्ण योजनेतून 2 कोटी 31 लाख रुपये खर्च करुन गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. येत्या काळात या सामग्रीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलस्त्रोत बळकट करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात गरज भासल्यास तालुकास्तरावरदेखील असे साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कोयनेचे अवजल चिपळूण परिसरातील गावांना उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सर्व्हे करण्यात येत आहे. त्यासाठी 15 लाखाचा निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गोवळकोट ते परशुराम परिसर रोपवे उभारणीच्या अभ्यासासाठी 15 लाख रुपये देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment