‘मेक इन इंडिया’मुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2016

‘मेक इन इंडिया’मुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल - मुख्यमंत्री

मुंबईदि. 23 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी घोषणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताचा विकास गतीने होण्यास मदत होत आहे. मेक इन इंडियामुळे भारताचे जागतिक पातळीवर महत्व अधोरेखित होत असून महासत्तेकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशनच्या वतीने  कर्नाक बंदर येथे आयोजित मेक इन इंडिया इंजिनिअरिंग लॉयन या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आमदार राज पुरोहित, माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहा उपस्थित होते.
            
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतातील विशाल तरूण मनुष्यबळाची ताकद ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली. भारताला जागतिक पातळीवर बलशाली बनविण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. देशात होणा-या आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण वाढावे, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.  लोकशाही, युवाशक्ती आणि मागणी या देशाच्या विकासप्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. उद्योग वाढीमुळे युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. भारताच्या गरजा भारतातच पूर्ण करून इतर देशांना वस्तूंची निर्यात करणे या ध्येयाने देशाची वाटचाल सुरू आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, चीनला जगाचा कारखाना म्हणून ओळखले जाते. परंतु यापुढे भारताला जगाचा कारखाना म्हणून ओळखले जाईल. तरुण मनुष्यबळाच्या जोरावर जगाला विविध वस्तूंचा पुरवठा करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या या सर्व क्षमता ओळखून विकासाची प्रक्रिया गतिमान केली आहे. मेक इन महाराष्ट्रचीही याच उद्देशाने वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गृहनिर्माण मंत्री महेता म्हणाले, उद्योगवाढीसाठी आवश्यक प्रयत्न शासन करत आहे. मेक इन इंडियाचे प्रतिक असलेला सिंहाचा पुतळा प्रेरणादायी आहे. आमदार राज पुरोहित यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशनच्या वतीने दुष्काळ निवारणासाठी 11 लाख 11 हजार 111 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मेक इन इंडियाचे प्रतिक असलेल्या सिंहाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक दि बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहा यांनी केले. यावेळी विविध उद्योग, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, कामगार, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad