महाराष्ट्रात संपूर्ण दारुबंदीचा निर्णय लागू करा!
मुंबई - प्रतिनिधी 19 मे 2016
“बिहारसारख्या आर्थिकदृष्ट्या मागासालेल्या राज्याचे सरकार जर तिथे संपूर्ण दारुबंदी जाहीर करू शकते, दारुतून मिळणा-या महसूलावर जनहितासाठी पाणी सोडू शकते, तर मग आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारला दारुबंदी करणे का शक्य होत नाही,” असा सवाल संयुक्त जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भुसेवार यांनी आज उपस्थित केला. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संपूर्ण दारुबंदी एक एप्रिल 2016पासून जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही संपूर्ण दारुबंदी जाहीर करावी, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भुसेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “देशात गुजरात, मिझोराम, केरळ यांच्यापाठोपाठ बिहार राज्यातही संपूर्ण दारुबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात फक्त वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीनच जिल्ह्यांत दारुबंदी आहे.” वर्धा येथे महात्मा गांधींचे वास्तव्य होते म्हणून पूर्वीपासूनच दारुबंदी आहे. पण चंद्रपूरमध्ये जर दारुबंदी होऊ शकते, तर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही दारुबंदीची अंमलबजावणी का होत नाही, असा सवालही श्याम भुसेवार यांनी उपस्थित केला.
शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे जशी दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही कारणे आहेत, तसेच दारुचे व्यसन हेसुध्दा एक प्रमुख कारण आहेत. राज्यातील अनेक ग्रामीण भागात ठिकठिकाणचे महिला गट तसेच सामाजिक संस्था दारुबंदीची मागणी करत असतानाही, सरकार या गंभीर विषयाकडे सातत्याने दुर्लक्षच करत असल्याचेही श्याम भुसेवार यांनी यावेळी सांगितले.
दारुविक्रीच्या महसुलापोटी महाराष्ट्र राज्यसरकारला दरवर्षी सुमारे 14 हजार कोटी रुपये मिळतात. या महसुलापैकीची किमान 1 टक्का रक्कम म्हणजेच सुमारे 140 कोटी रुपये दारुबंदीचा प्रसार करण्यासाठी खर्च करणे बंधनकारक असतानाही राज्य सरकारने हा निधी त्या कामी खर्च केलेला नाही. इतक्या वर्षांचा हा निधी आता निश्चितच हजारो कोटींच्या घरात गेला असून त्याचे सरकार नेमके काय करणार आहे, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही संयुक्त जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भुसेवार यांनी यावेळी केली.
दारुतून मिळणा-या महसुलाकडे विविध जनकल्याणाच्या योजनांसाठीच्या निधीचा स्रोत म्हणून पाहणे चुकीचे आहे. गुजरात, केरळ किंवा बिहारमध्ये जर दारुबंदीनंतरही विकास होऊ शकतो, तर महाराष्ट्राचा विकास का होऊ शकत नाही, असा सवालही श्याम भुसेवार यांनी यावेळी उपस्थित केला. चंद्रपूरमध्ये ज्याप्रमाणे दारुबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या व त्याची दखल घेत राज्य सरकारला तिथे दारुबंदी जाहीर करावी लागली, त्याप्रमाणेच जूनमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी संयुक्त जनता दलाच्या नेतृत्वाखाली लाखो महिला दारुबंदीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचेही पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भुसेवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परीषदेला संयुक्त जनता दलाचे पदाधिकारी हेमंत संसारे, रवींद्र कोरडे, अभिषेक दुबे व हिम्मतसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment