मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाच्या निकालाविरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार – संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2016

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाच्या निकालाविरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार – संजय निरुपम

मुंबई / प्रतिनिधी 24 May 2016
NIA च्या माध्यमातून मोदी सरकार आणि RSS जे षड्यंत्र करत आहेत. त्यात आम्ही त्यांना यश मिळू देणार नाही. त्यांच्या या नकली चेहऱ्याचा आम्ही पर्दाफाश करू. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाच्या निकालाविरोधात काँग्रेस न्यायालयात जाईल असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. 


मालेगाव बॉम्ब स्फोटातील पिडीतांचे नातेवाईक आझाद मैदान येथे उपोषणास बसले होते. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, जेव्हापासून मोदी सरकार आले आहे तेव्हापासून आतंकवाद या विषयावर राजनीती होत आहे. मालेगावमध्ये जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा ATS चे जिगरबाज अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांना कळले की या बॉम्ब ब्लास्ट साठी ज्या विशेष (मुस्लीम) धर्माच्या लोकांना जबाबदार धरले जात होते. त्यांचा या प्रकरणामध्ये काही संबंध नव्हता. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक सामील होते. हे सर्व RSS षड्यंत्र होते.

या चौकशीत कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांचे नाव पुढे आले. साध्वी प्रज्ञा सिंह या पूर्ण षडयंत्राच्या मुख्य सूत्रधार होत्या. या बॉम्ब स्फोटासाठी लागणारे RDX कर्नल पुरोहित यांनी सप्लाय केले होते. तेव्हा भाजपावाले ओरड करू लागले की या प्रकरणात जाणूनबुजून हिंदूंचे नाव गोवले जात आहे. त्या वेळेस लालकृष्ण अडवाणी हेमंत करकरेंना भेटले. हेमंत करकरे नितीन गडकरींना भेटले. जे त्यावेळेस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. हेमंत करकरेंनी या प्रकरणाची सर्व माहिती नितीन गडकरींना दिली आणि सर्व भाजपा नेत्यांची तोंडे बंद झाली. पण आता सरकार बदलले आणि चौकशीची दिशाच बदलली. मोदी सरकार NIA चा दुरुपयोग करत आहे. ATS च्या रिपोर्ट मध्ये दोष शोधा आणि नवी चार्जशीट फाईल करा असे त्यांचे म्हणणे आहे. जे हेमंत करकरे २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झाले. त्यांचे नाव भाजपाचे नेते बदनाम करत आहेत. हेमंत करकरेनी कर्नल पुरोहित यांच्या घरी RDX लपवले आणि त्यांचे नाव या प्रकरणात अडकवले असा खोटा आरोप हे भाजपावाले आणि RSS वाले करत आहेत. आम्ही या सर्वांसाठी भाजपच्या विरोधात कायदेशीर लढा देऊ असे निरुपम म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, माझे मोदी सरकारला एक सांगणे आहे की आतंकवादावर  राजनीती करणे बंद करा. आतंकवादी हिंदू असो, मुस्लीम असो किंवा अजून कोणत्याही धर्माचा असो तो आतंकवादी च असतो. आतंकवादाला कोणताही धर्म नसतो. कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंह ठाकुर या समाजात एका सडक्या अंड्यासारख्या आहेत. त्यांच्या अटकेमुळे भारताची कोणतीही बदनामी होणार नाही.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की,  मालेगावमध्ये नमाज नंतर जे बॉम्ब स्फोट झाले. त्यात जे लोक मारले गेले त्यांचे नातेवाईक त्यांना न्याय मिळावा अशी आस लावून बसले आहेत. सरकार कोणतेही असुदे त्यांना न्याय मिळायला हवा. त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शहीद हेमंत करकरे यांनी या प्रकरणाची पूर्ण इमानदारीने चौकशी केली. पण आता सरकार बदलले, चौकशीसुद्धा बदलली. सरकारने या चौकशीमध्ये धाव्लाधवल करण्यास सुरवात केली. त्यामुळे ATS ने या प्रकरणाचा रिपोर्ट दिला होता आणि नंतर NIA जो रिपोर्ट दिला त्यात फरक झाला. रोहिणी सालियन या प्रकरणाच्या सरकारी वकील होत्या. त्यांनी ६ महिन्यापूर्वी पोलिसांना जबानीत सांगितले होते की त्यांच्यावर या केस संदर्भात दबाव टाकला जात आहे. यानंतर त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला. जोपर्यंत मालेगाव बॉम्ब स्फोटातील पिडीतांच्या नातेवाईकांना, सर्व मालेगाव वासियांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत. त्यांना कोणालाही घाबरण्याची गरज नाही. काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.  

मालेगाव बॉम्ब स्फोटातील पिडीतांचे नातेवाईक आझाद मैदान येथे आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले होते. या उपोषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आमदार असलम शेख, अल्पसंख्याक मुंबई विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सय्यद झीशान अहमद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता अल-नासीर झकेरिया सहभागी झाले होते. याप्रसंगी शहिद हेमंत करकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad