मुंबई 23 May 2016 : रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांकडून पान किंवा गुटखा खाऊन थुंकले जाते आणि अस्वच्छता पसरविण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कारवाई केली जात असतानाच आता पश्चिम रेल्वेकडून स्टेशन मास्तरांनाही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पान, गुटखा खाऊन पिचकारी टाकणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म अस्वच्छ होतात. प्लॅटफॉर्मबरोबरच ट्रॅकवरही खाऊन थुंकले जाते आणि त्याचा फटका ट्रॅकवर काम करणाऱ्या रेल्वे कामगारांना बसतो. त्यामुळे थुंकणाऱ्या आणि अस्वच्छता पसरविणाऱ्या प्रवाशांविरोधात आरपीएफकडून कारवाई केली जाते. आरपीएफकडून कारवाई केली जात असतानाच आता पश्चिम रेल्वेने स्टेशन मास्तरांनाही थुंकणाऱ्या आणि स्थानकात अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना रेल्वे कायदा कलम १९८नुसार केल्या आहेत. तसे टार्गेटही पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून सर्व स्टेशन मास्तरांना देण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रत्येक दिवशी पाच, दादर स्थानकात दहा, वांद्रे दहा, वांद्रे टर्मिनसमध्ये पाच, अंधेरीत दहा आणि बोरीवली स्थानकात दहा जण पकडण्याचे टार्गेट प्रत्येक स्टेशन मास्तरांना देण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तर अन्य स्टेशनला त्यापेक्षा कमी टार्गेट देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment