मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गेल्या 15 वर्षात शेतकऱ्यांना केवळ 4737 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र राज्य शासनाने केलेल्या प्रभावी प्रयत्नांचा परिणाम म्हणून खरीप 2015 च्या अवघ्या एका हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 4205 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात 1999-2000 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. शासनाने केलेल्या विविध प्रयत्नांमुळे एकूण 82.50 लाख शेतकऱ्यांना यंदा विम्याच्या कक्षेत आणण्यात आले होते. त्यापैकी 71.50 लाख म्हणजे जवळजवळ 90 टक्के शेतकऱ्यांना कृषी विम्याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या जिल्ह्यांना यामुळे मोठा लाभ मिळणार असून त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेचा सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांना विम्यापोटी 892.98 कोटी रुपये मिळणार आहेत. लातूरमधील शेतकऱ्यांना 604.59 कोटी, परभणीतील शेतकऱ्यांना 488.65 कोटी तर उस्मानाबादमधील शेतकऱ्यांना 465.51 कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. सुमारे 49.33 लाख हेक्टरवरील विविध पिकांसाठी हा लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत मंजूर झालेली ही विक्रमी नुकसानभरपाई असून भारतीय कृषी विमा कंपनीकडून संबंधित बँकांमार्फत मंजूर रक्कम शेतकऱ्यांना बँक खात्यावर जमा करण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment