मुंबई, दि. 11 : गेल्या काही वर्षांपासून पर्जंन्य कमी झाले आहे. राज्यातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती आहे. कमी पर्जंन्यमानामुळे चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा मिळणे अवघड झाल्याने राज्य शासन पशुधनासाठी अनेक उपाय योजना करत आहे. सुमारे 379 चारा छावण्या सध्या सुरू आहेत. या चारा छावण्यांचा 4,07,477 जनावरांना लाभ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनावरांचा चारा आणि पाणी यासंबंधी सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
विशेषत: मराठवाड्यातील जनतेला टंचाईचा अधिक सामना करावा लागत आहे. सध्या बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर येथे सुमारे 379 चारा छावण्या सुरू आहेत. बीड येथे 271, उस्मानाबाद येथे 88, अहमदनगर येथे 15 तर लातूर येथे 5 चारा छावण्या सुरू आहेत. यामध्ये लहान, मोठी जनावरे आहेत. चारा छावण्यांमुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळत आहे. मराठवाड्यासह राज्याच्या ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला काळजीपूर्वक नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यातील पशुधनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. चारा छावण्यांसाठी शंभर कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला आहे. टंचाईमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. टंचाई परिस्थितीत जनावरांचा सांभाळ करणे ही शेतकऱ्यांची मोठी समस्या होती. या चारा छावण्यांमुळे जनावरांची देखभाल करण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होत आहे. टंचाई निवारणाच्या करण्यात आलेल्या अनेक उपाय योजनांमधील चारा छावणी ही एक महत्वपूर्ण उपाय योजना आहे.
चारा टंचाईमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडल्याने गरज असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याची शासनाची भूमिका आहे. चारा टंचाईमुळे दुग्ध उत्पादनावरही परिणाम होत असतो. दुग्ध उत्पादनावर परिणाम होऊ नये आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्थैर्य बिघडू नये यासाठी चारा छावण्यांचा उपयोग होत आहे. शेतकरी बांधबांना यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील पशुधन वाढविणे ते जगविणे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे
No comments:
Post a Comment