मुंबई, दि. 20 : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 291 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी येथे 31 मे रोजी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गृहराज्य मंत्री प्रा.राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 291 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजन बैठक झाली. यावेळी आमदार अनिल गोटे, माजी आमदार पोपटराव गावडे, रमेश शेंडगे, गणेश हाके आदीसह राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.
प्रा.शिंदे म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मगाव म्हणून चौंडी येथे जयंती साजरी करण्यात येत आहे. या ठिकाणी होणाऱ्या जयंती कार्यक्रमाला कोणत्याही संघटना किंवा राजकीय पक्षाचे स्वरुप न आणता तो कार्यक्रम सर्वसमावेशक असेल. मी पक्ष बाजूला ठेवून एक चौंडीचा नागरिक म्हणून चौंडी येथे जयंती कार्यक्रमास येणाऱ्या समाजबांधवांचे स्वागत आणि सेवा करण्यास उत्सूक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे चोंडीला येणार
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 291 व्या जयंतीनिमित्ताने चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना निमंत्रण दिल्याची माहिती राज्यमंत्री प्रा.शिंदे यांनी यावेळी दिली.
धनगर आरक्षणासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यासमवेत बैठक
राज्यमंत्री प्रा.शिंदे यांनी आपल्या भाषणात आमचे सरकार धनगर आरक्षणाच्या संदर्भात गंभीर असून, आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरक्ष्ाणाच्या प्रश्नासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आली असून यामध्ये आरक्षणासंदर्भात आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट केली जाणार आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment