मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून 2016 या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताहाचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2016

मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून 2016 या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताहाचे आयोजन

मुंबई, दि. 27 :  ग्रामविकास विभागामार्फत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ दि. 3 ते 9 जून 2016 या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या पर्यावरण सप्ताहात सर्व जिल्हा परिषदा आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

          
या कालावधीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा प्राथमिक-माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, समाज मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन शासकीय, निमशासकीय कार्यालये व दुतर्फा रस्ता इत्यादी ठिकाणी प्राधान्याने वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या रोपांचा पुरवठा प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांच्याद्वारे केला जाणार आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमाचे गावनिहाय नियोजन करण्यात येणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना नरेगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असून हा सप्ताह अधिक यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियंत्रण विभागीय आयुक्त करणार आहेत.
          
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांचे हे योगदान विचारात घेता त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
          
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दि. 3 ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह घोषित करण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावयाचे असून जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad