मुंबई, दि. 13 : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी 150 कोटी रुपयांचा निधी रोहयो विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
सन 2016-17 या वित्तीय वर्षामध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत, त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. रोजगार हमी योजना विभागाला 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी तात्काळ कृषी आयुक्त, पुणे यांना वितरित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले असल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीत जास्त शेततळ्यांची निर्मिती होऊन पाण्याचे विकेंद्रित साठे तयार व्हावेत, तसेच नागरिकांचा रोजगार मिळावा या उद्देशाने रोहयो विभागाकडे हा निधी सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च होणे आवश्यक असून तो परत गेल्यास किंवा बँकेत काढून ठेवल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. निधीचा योग्य विनियोग होत असल्याची खातरजमा रोहयो विभागाने करावयाची असून अन्य उपाययोजना व बाबींवर निधी खर्च होणार नाही याची दक्षताही रोहयो विभागाने घ्यावयाची आहे.
No comments:
Post a Comment