मुंबई दि 27: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पेपरफुटीमुळे दि. 18 मे 2016 रोजी आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर क्रमांक 1 ची फेरपरीक्षा आता 7 जून 2016 रोजी घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 16 जानेवारी 2016 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षेतील पेपर क्रमांक 1 रद्द करण्यात आला होता. सदर पेपर क्रमांक 1 ची फेरपरीक्षा 18 मे 2016 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. मात्र याच दिवशी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या परीक्षा जाहीर झाल्याने या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ‘टीईटी’ परीक्षेत बदल करण्यात आला होता. दिनांक 16 जानेवारी 2016 रोजी या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाच फेरपरीक्षेला बसता येणार आहे. ही फेरपरीक्षा येत्या 7 जून 2016 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेबाबत, हॉल तिकीट, परीक्षा केंद्र, तसेच इतर आवश्यक माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in आणि mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त बी.डी. फडतरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment