क्रॉफर्ड मार्केट 2 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2016

क्रॉफर्ड मार्केट 2 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
क्रॉफर्ड मार्केट (महात्मा फुले मंडई)ची दुरुस्ती करताना मुंबई महापालिकेने केलेले दुकानांचे बांधकाम निकृष्ट असल्याने त्याविरोधात 2 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मंडईतील 30 फुटांच्या मोकळ्या जागेवर बांधकाम सुरू असल्याचा आरोप व्यापऱ्यांनी केला. या जागेत पालिका 14 दुकाने बांधणार आहे. ही मंडई अतिरेक्‍यांच्या हिट लिस्टवर आहे; शिवाय आगीसारखी दुर्घटना घडल्यास मंडईतून बाहेर पडण्यासाठीही जागा शिल्लक नाही, असाही व्यापाऱ्यांचा दावा आहे.

मंडईच्या आत 585 दुकाने असून, तेथे जोते होते. त्यानंतर दुकानदारांनी भिंत बांधली. मंडईची दुरुस्ती करताना गाळेधारकांना दुकाने बांधून देण्यात येत आहेत. पालिकेने गाळेधारकांना आराखडाही दाखवला होता. परंतु, पालिका बांधकामात निकृष्ट लोखंड वापरत असल्याचा आरोप सोमवारी (ता. 1) दुकानदार सेवा संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर कराळे व माजी अध्यक्ष अर्जुन ढले यांनी पत्रकार परिषदेत केला.

बांधकामातील त्रुटींची माहिती आम्ही पालिकेला वेळोवेळी दिली; परंतु आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मंडईतील सर्व व्यापारी आझाद मैदानात पालिकेविरोधात आंदोलन करणार असल्याचे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेणार असल्याचे व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या मंडईत फळे, भाज्या, किराणा माल, सुका मेवा, खेळणी, मटण, सौदर्यप्रसाधनांची दुकाने आहेत. तेथे रोज सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. पालिकेला वार्षिक 78 लाख रुपयांचा महसूल मिळतो. 

Post Bottom Ad