गेट वे ऑफ इंडियावर रंगणार १८ फेब्रुवारी रोजी 'आंबेडकरी जलसा' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2016

गेट वे ऑफ इंडियावर रंगणार १८ फेब्रुवारी रोजी 'आंबेडकरी जलसा'

मुंबई JPN NEWS www.jpnnews.in  दि. ९ फेब्रुवारी : 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे भव्य स्वरूपातील 'आंबेडकरी जलसा' चे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेषत: तरुणांसाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांबरोबरच ज्यांना आंबेडकरी विचारांचा वणवा लोककलांद्वारे समजून घ्यायचा आहे, त्यांच्याकरिता ही प्रबोधनाची आणि रंजनाची अनोखी पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाची माहिती देताना तावडे यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेला हा सोहळा त्यादिवशी सायंकाळी ७ वाजता आंबेडकरी नमनाने सुरू होईल.  यात महाराष्ट्रातील आंबेडकरवादी लोकप्रिय कलाकार लोककलेद्वारे सादर करणाऱ्या आंबेडकरी जलसात जेष्ठ कलावंत नागसेन सावदेकर, शाहीर नंदेश उमप, सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, लोककला अभ्यासक आणि 'तमाशा'कार डॉ.गणेश चंदनशिवे, भारुडकार मीरा उमप, गायक योगेश चिकटगावकर, अजय देहाडे, मेघानंद जाधव, कुणाल वराळे, अनिरुद्ध वनकर, नाट्य कलावंत विनायक सैद आणि गाडगेबाबा निरुपणकार खंडुजी गायकवाड आपली कला सादर करणार आहेत.  छत्तीसगड येथील सुप्रसिध्द कबीर गायक पद्मश्री पं.भारतीबंधू यांची 'कबीरवाणी' हे या सोहळयाचे आणखी एक आकर्षण असेल. आंबेडकरी नमन, कबीरवाणी, कीर्तन, बतावणी, भारुड, पोवाडा, गोंधळ, मूकनाट्य आणि बुद्धवंदना असे कलाप्रकार या भरगच्च कार्यक्रमात सादर होणार आहेत असेही तावडे यांनी सांगितले. 

गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे सादर होणारा 'आंबेडकरी जलसा' हे त्यावेळच्या जलसाचे आधुनिक सुसज्ज असे रुप असणार आहे.  हा कार्यक्रम सर्वांना खुला असून या कार्यक्रमाच्या प्रवेशिका दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी : शिवाजी मंदिर, दादर : महाराष्ट्र वॉच कंपनी, दादर : यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा : प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली : राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे  या ठिकाणी १३ फेब्रुवारी पासून उपलब्ध असतील.

Post Bottom Ad