मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
विक्रोळी येथील पार्क साईट येथील आनंदगड चंद्रभागा सोसायटी परिसरातील एका गादीच्या दुकानात अचानक शॉकसर्किट झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे दोन सिलेंडरचा स्फोट झाला. शनिवारी दुपारी ३.१५ वाजता झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये (आई) सलमा बेलीम (४५), मोहम्मद बेलीम (४) व मेराज बेलीम (१५) यांचा समावेश आहे.
या आगीची माहिती मिळताच ३.४५ वाजता अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले. आग विझवण्यासाठी दोन वॉटर पंप व एक रुग्णवाहिका आणण्यात आली होती. आगीची व्याप्ती प्रचंड असल्याने २० मिनिटांनंतर आग आटोक्यात आण्यात अग्निशमन दलाला यश आहे. त्यानंतर या आगीत भाजलेल्या दोन मुलांना व महिलेला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात आणले यावेळी ही तिघही ७० ते ८० टक्के भाजलेले होते. या स्थितीत यांना वाचवणे खूपच कठिण होते, असे राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी म्हटले आहे.
अवघ्या काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग वरच्या दिशेने पसरत गेली. या दुकानाच्या वरती खोलीत ही मंडळी राहत होती. आग लागली तेव्हा वरच्या खोलीत सलमा आपल्या तीन मुलांसह झोपल्या होत्या. आगीमुळे घरातील दोन्ही सिलेंडरचा स्फोट झाल्याने हे तिघे जण या आगीत भाजले. वडिल व लहान मुलगी दुकानात असल्याने ते वाचले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये विक्रोळी येथील पार्क साईटमध्येच एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या परिसरात अशाप्रकारची घटना घडल्याने जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.