मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ जळून खाक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 February 2016

मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ जळून खाक

आगीची चौकशी करणार : मुख्यमंत्री
मुंबई / www.JPNnews.in   ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेचे ‘ब्रँडिंग’ करण्यासाठी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमाचे व्यासपीठ कार्यक्रम सुरू असतानाच जळून खाक झाले. या दुर्घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नव्हते. या आगीमुळे सप्ताहालाच गालबोट लागले आहे.

गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांंर्गत मेगा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या भव्य व्यासपीठ उभारले होते. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन, आमीर खान यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठावर अभिनेत्री पूजा सावंत यांचा चमू लावणी सादर करत होता. नेमके यावेळी नटराजाची मूर्ती असलेल्या व्यासपीठाच्या मध्यभागी आग लागली. दर्शनी भागावर लागलेल्या या आगीनंतर तत्काळ व्यासपीठावर नृत्य सादर करणाऱ्याना कलावंतांना खाली उतरवण्यात आले. मुंबई पोलिसांनी समयसूचकता दाखवत संपूर्ण व्यासपीठासह परिसर रिकामा केला. अवघ्या काही मिनिटांत व्यासपीठावर लागलेल्या आगीने भयंकर स्वरुप घेतले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सहा वॉटर टँकर आणि जेट इंजिनद्वारेही आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र घटनास्थळी शोभेचे दारुकाम आणि अग्नीशमन सिलिंडरर्सचा स्फोट झाला. चौपाटीवरील वाऱ्याने ही आग आणखी पसरली. रात्री या परिसरात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने अग्मिशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहचण्यास काहीसा विलंब झाला. शिवाय सोफा, खुर्च्या आणि पुतळे उभारण्यात आल्याने आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

आगीची चौकशी करणार : मुख्यमंत्री

दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली याचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यांकडून वर्गाकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. व्यासपीठाला आग लागली तेव्हा कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठाच्या समोरच्या भागात पहिल्यांदा आग लागली. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. चार दिवसांपूर्वी या ठिकाणाचे फायर आॅडिट करण्यात आले होते. आपत्तीकालीन व्यवस्थापन आराखडा आम्ही तयार ठेवलेला होता. आगीचे कारण लगेचच सांगता येणार नाही. घटनास्थळी चार आगीचे बंब तैनात होते. आग लागल्यानंतर सोळा गाड्या दाखल झाल्या, असे फडणवीस यांनी सांगितले. सगळे कलावंत, नागरिक सुखरुप आहेत. लाकडे आणि व्यासपीठावरील पडद्यांनी आगीचे स्वरुप वाढले. एसओपी (स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर) मध्ये काही उणीवा होत्या का? हे देखील तपासले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Post Bottom Ad