उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण - प्रकृती खालावली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण - प्रकृती खालावली

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in 
गोरेगाव चित्रनगरीतून हद्दपार करू नये म्हणून बुधवारपासून पत्नीसह उपोषणाला बसलेल्या उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उपाहारगृहात कोंडून घेतलेल्या गायकवाड यांची प्रकृती खालावली आहे; शिवाय त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

गायकवाड यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी व्यक्त केली. या वेळी चित्रनगरीचे सहसंचालक उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे गायकवाड यांच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी गायकवाड यांची भेट घेतली.
सरकारविरोधातील या लढ्यात मुंडे यांनी गायकवाड यांना पाठिंबाही दर्शविला. सांस्कृतिकमंत्र्यांकडून गायकवाड यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईचा मुंडे यांनी निषेध केला. न्यायालयाचा मान राखण्याचे कारण देणारे तावडे गायकवाड यांना वेगळा आणि हेमा मालिनी व सुभाष घई यांना वेगळा न्याय का देत आहेत, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.
गायकवाड यांनी स्वत:ला कोंडून घेतल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गुरुवारी विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींसह विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. ‘लढा सुरू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेतही अन्यायाला वाचा फोडू,’ असे आश्वासन काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. खरगे लवकरच मुंबईत येऊन गायकवाड यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.

Post Bottom Ad