सहकारमंत्र्यांच्या नियमबाह्य फॅन्सी नंबरप्लेटवाल्या कारला दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2016

सहकारमंत्र्यांच्या नियमबाह्य फॅन्सी नंबरप्लेटवाल्या कारला दंड

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in 
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या फॉर्च्युनर कारची नंबरप्लेट नियमबाह्य असल्याने ती जप्त करून कारचालकास १०० रुपये दंड करण्यात आला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर यांनी ही कारवाई केली.

सहकारमंत्री पाटील शनिवारी पंढरपूर, अक्कलकोट आणि बार्शी येथील विविध कार्यक्रमासाठी दौऱ्यावर आले होते. बार्शीत पोहोचल्यानंतर त्यांनी एमएच-१३ सीएफ ८११० या फॉर्च्युनर कारचा वापर केला. या कारवर ८११० या क्रमांकातून इंग्रजीत बीजेपी असा उल्लेख दिसत होता. सहकार मंत्र्याच्या गाडीला फॅन्सी नंबरप्लेट असल्याची ही बाब एकाने निदर्शनास आणून दिली. संबंधित गाडीचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रचंड टीका झाली. युती सरकार एकीकडे नागरिकांना हेल्मेट वापराची सक्ती करत असताना, दुसरीकडे मंत्रीच परिवहन नियमांचे उल्लंघन करत असल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर यांनी संबंधित गाडीचा चालक कोळी यास १०० रुपये दंड करून ती नंबरप्लेटही जप्त केली. 

Post Bottom Ad