पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात काल बुधवारी आरटीआय अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पासपोर्ट मिऴविण्यासाठी विवाहसंदर्भात दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती जशोदाबेन यांनी आरटीआय अर्जाद्वारे मागितली आहे.
नोव्हेंबर २०१५ मध्ये जशोदाबेन यांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांना विवाह प्रमाणप्रत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न केल्याचे संयुक्त प्रतिज्ञापत्र यांचा पुरावा सादर केला नाही, म्हणून त्यांचा अर्ज नाकारला होता. जशोदाबेन बुधवारी कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी आपल्या पासपोर्टसंदर्भात माहितीसाठी आरटीआय अर्ज दाखल केला आहे. आम्ही त्यांच्या अर्जाचे उत्तर योग्य त्यावेळी देऊ, असे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी झेड. ए. खान यांनी सांगितले. तसेच, जशोदाबेन यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यावेळी पासपोर्टसाठी लागणा-या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे त्यांच्या अर्ज नाकारला होता, असे खान यांनी सांगितले. जशोदाबेन यांचा भाऊ अशोक मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जशोदाबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पासपोर्टसाठी सादर केलेल्या विवाहसंदर्भातील कागदपत्रांची माहिती आरटीआय अर्जाद्वारे मागितली असल्याचे सांगितले.