मेक इन इंडिया कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर राज्यातल्या दुष्काळाच्या चित्रफितीचे सादरीकरण करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

मेक इन इंडिया कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर राज्यातल्या दुष्काळाच्या चित्रफितीचे सादरीकरण करा

राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई / www.JPNnews.in
स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभुमी असे नामांतर केल्यानंतरही ते वापरण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मेक इन इंडिया या कार्यक्रमाच्या ठिकाणाचा उल्लेख करताना गिरगाव चौपाटी ऐवजी " स्वराज्यभुमी ' असा नामोल्लेख करण्याची मागणी केली. तसेच राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकार जर हट्टाने हा साेहळा घडवून आणत असेल, तर किमान या सोहळ्यात पंतप्रधानांसमोर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देणाऱ्या एखाद्या ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण तरी करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अहिर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टीळकांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

मोठा गाजावाजा करून देशाच्या आर्थिक राजधानीत कोट्यवधींची उधळण करून मेक इन इंडिया या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येत आहे. या सोहळ्यादरम्यान मुंबईतील गिरगाव चौपाटीवरही एका लेझर शो चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्याच्या जाहिरातीत ठिकाणाचा उल्लेख करताना गिरगाव चौपाटी असा उल्लेख करण्यात येत आहे. वास्तविक याच सरकारने सत्तेवर आल्यावर गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभुमी असे नामकरण केले होते. मात्र आपल्याच निर्णयाचा या सरकारला विसर पडला आहे का असा सवाल करत मा. अहिर म्हणाले की, हे ठिकाण म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. आज राज्यात भीषण दुष्काळ आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. त्याबद्दल विचारणा केली तर मुंबई शहराचे पालकमंत्री म्हणतात, ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, फक्त तोच परिसर स्वराज्यभुमी या नावाने ओळखला जातो. त्यामुळे नेमके तथ्य काय आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच राज्यातील दुष्काळाचे या सरकारला काहीच सोयरसुतक दिसत नाही. मदतीबाबत वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार राज्य सरकारच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. आता किमान या सोहळ्याचा वापर करून आपले म्हणणे पंतप्रधानांसमोर मांडण्याची नामी संधी राज्य सरकारला आली आहे. उदघाटन सोहळ्यादरम्यान राज्याच्या दुष्काळाची वस्तुस्थिती कथन करणारी एखादी चित्रफित पंतप्रधानांना दाखवावी, म्हणजे तरी केंद्र सरकारकडून काही मदत मिळवता येईल, अशी सुचनाही अहिर यांनी सरकारकडे केली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचेही ते म्हणाले.

Post Bottom Ad