मुंबई / www.JPNnews.in
राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी मराठवाडा मागास ठेवणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये. शेतकऱ्यांच्या नावाने 'मेक इन इंडिया'वर टीका करण्याऱ्यांनी आधी सिंचन घोटाळ्याचा हिशेब द्यावा. 'मेक इन महाराष्ट्र' हा उपक्रम मराठवाड्यासह राज्याच्या आर्थिकदृष्ट्या मागास भागात कारखाने वाढून शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठीच आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांचा समाचार घेताना माधव भांडारी म्हणाले की, राज्यात गेली पंधरा वर्षे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे राज्य होते. या काळात सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले नाही. त्यांच्या आत्महत्या आघाडी सरकारचेच पाप आहे. हजारो कोटींचा सिंचन घोटाळा झाला नसता तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. गेल्या पंधरा वर्षात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरीविरोधी धोरणे कारणीभूत आहेत. त्यामुळे 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' असे शब्दांचे खेळ करण्यापेक्षा आपण गेली पंधरा वर्षे शेतकऱ्यांच्या जिवाशी कसे खेळलो, याचा हिशेब सिंचन घोटाळा करणाऱ्यांनी द्यावा.
त्यांनी सांगितले की, आता भाजपा युती सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमात 'दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर'अंतर्गत शेंद्रा बिडकिन केंद्र विकसित करण्यात येत आहे. त्याचे अनावरण 'मेक इन इंडिया वीक'मध्ये होईल. राज्य सरकारने मराठवाड्याच्या आर्थिक विकासासाठी आणि तेथील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळेल व आपले राजकारण कायमचे अडचणीत येईल या भीतीने धनंजय मुंडे यांनी आरोप सुरू केले आहेत. विकासाच्या राजकारणावरून लक्ष हटविण्याचा त्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.
ते म्हणाले की, आपल्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागू नये यासाठी जाणीवपूर्वक मराठवाडा मागास ठेवण्याचे षडयंत्र आधीच्या सत्ताधाऱ्यांनी केले. पंधरा वर्षात त्यांनी मराठवाड्याला एकही सिंचन प्रकल्प किंवा रोजगार मिळेल असा उद्योग दिला नाही. ज्यांनी गेल्या पंधरा वर्षात मराठवाड्याला हक्काचे पाणी दिले नाही आणि उद्योगधंदे जाणीवपूर्वक उभे राहू दिले नाहीत, ज्यांचे प्रत्येक पाऊल मराठवाडा भकास करण्याचेच होते, त्यांनी शहाणपण शिकवू नये.