अपंगांचे पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन
तर पुढचे आंदोलन महापौर बंगल्यात घुसून करू - आमदार बच्चू कडू
मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS www.jpnnews.in
राज्य सरकारने दुर्लक्षित घटक असलेल्या अपंगांसाठी विविध उपाययोजना आणि अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी वेळोवेळी शासन परिपत्रक, शासन निर्णय काढले आहेत. या शासन निर्णय आणि परिपत्रकाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थानी अमलबजावणी करणे अपेक्षित असताना देशातील श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात अपंगासाठी तरतूद केली नसल्याने अपंगांनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
राज्य सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने प्रत्तेक अर्थसंकल्पात अपंगांसाठी 3 टक्के राखीव निधीची तरतूद करावी, जन्म मृत्यु नोंदीप्रमाणे मुंबईमधील अपंगांची नोंद करावी, 1995चा अपंग व्यक्ती कायदा आहे तसा राबवावा, भूखंड निवासी व व्यापारी गाले वाटपामधील 1996 पासूनचा अनुशेष 3 टक्क्या प्रमाणे भरुन काढावा,
अपंगांच्या 3 टक्के निधीचे नियंत्रण करण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर लवकरात लवकर समिती गठित करून त्यात अपंगांना स्थान द्यावे, अपंगांच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रभाग निहाय वार्ड निहाय अधिकारी नेमावा, बेस्ट बसमधे अपंगांना मोफत प्रवास उपलब्ध करून द्यावा इत्यादी विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
अपंगांच्या विविध न्याय मागण्याबाबतचे पत्र एक महीना आधी देवुनही महापालिका प्रशासनाने मागण्याकड़े दुर्लक्ष केले होते. राज्य सरकारने कायदे करूनही महापालिका त्या कायद्यांची अमलबजावणी करत नसल्याने संतापलेल्या अपंगांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर दोन वेळा रास्ता रोको केला. पोलिसांनी केलेल्या विनंती नंतर रास्तारोको करणारे अपंग महापालिका मुख्यालयाकड़े वळले आणि मुख्यालया समोर ठिय्या आंदोलन केले. जो पर्यंत महापालिका आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तो पर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
अपंग काही केल्या ठिय्या आंदोलन मागे घेत नसल्याने अखेर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आमदार बच्चू कडू आणि अपंगांच्या शिष्टमंडलाला भेटीसाठी बोलवले. परंतू आमदार कडू आणि अपंगांच्या शिष्टमंडलाने लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत मुख्यालयासमोरून हटणार नसल्याचा इशारा दिल्यावर देशमुख यांनी मागण्याबाबत योग्य अमलबजावणी करण्याचे आणि 8 मार्चला बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. देशमुख यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत असलो तरी 8 मार्चला समाधानकारक कारवाई झाल्याचे न दिसल्यास महापौरांच्या बंगल्यात घुसून आंदोलन करू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.