राणीच्या बागेतील पेंग्विन प्रकल्पाच्या खर्चात ४० टक्के कपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 February 2016

राणीच्या बागेतील पेंग्विन प्रकल्पाच्या खर्चात ४० टक्के कपात

मुंबई / www.JPNnews.in
वादात सापडलेल्या राणीच्या बागेतील पेंग्विन प्रकल्पाच्या खर्चात पालिकेने थेट ४० टक्के कपात केली आहे़ त्यामुळे तब्बल १०६ कोटी रुपयांऐवजी या प्रकल्पासाठी आता केवळ ६५ कोटी रुपयेच देण्यात येणार आहेत़ त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दणका बसला आहे़
सिंगापूरच्या धर्तीवर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण होणार आहे़ या प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणण्याचा निर्धार पालिकेने केला़. चिली व पेरु या देशातून ३ नर व ३ मादी पेंग्विन खरेदी करण्यात आले आहेत़ यासाठी पालिकेने २ कोटी ५७ लाख रुपये मोजले असून, पेंग्विन असलेली राणीची बाग हे देशातील पहिले प्राणिसंग्रहालय ठरणार आहे़
परदेशातून पेंग्विन आणण्याबरोबरच त्यांची व्यवस्था व प्रेक्षक गॅलेरी आदीसाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती़ कालांतराने यात मोठे ग्रंथालय, ५ डी थिएटरचा समावेश करून ही तरतूद १०६ कोटींपर्यंत वाढविण्यात आली़ मूळ ७० कोटींच्या या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या होत्या. त्यामुळे या वाढीव खर्चाबाबत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविले़
केवळ ठेकेदाराच्या आर्थिक फायद्यासाठी हा खर्च वाढविण्यात आल्याचे समोर आल्यानंतर या कामांना आयुक्तांनी कात्री लावली़ गेल्या निवडणुकीत घोषणा केलेले पेंग्विन पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत आणण्याची शिवसेनेची धावपळ सुरू आहे़ त्यामुळे वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे़ 

Post Bottom Ad