मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
बेकायदा बांधकामप्रकरणी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याचे पडसाद शनिवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. आयुक्तांनी सर्व प्रभागातील सहायक आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. प्रभागाचे प्रमुख म्हणून सर्व कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची आहे. ते त्यांची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकतात. मग हे अधिकारी चुकीच्या मार्गाला जातात. हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, बेकायदा बांधकामांवर देखरेख ठेवण्याची जबादारी सहायक आयुक्तांचीच आहे. बेकायदा बांधकामाला त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. मुंबईतील बेकायदा बांधकामांसाठी सहायक आयुक्तांना जबाबदार धरण्यावर गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे; मात्र प्रत्यक्षात यावर कधीच निर्णय झाला नाही. आता आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे सहायक आयुक्तांचे धाबे दणाणले आहेत.